महिलांच्या आसनव्यवस्थेसाठी नगरसेवकाचा असाही उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

प्रभागातील पिठाची गिरणी, मंदिर येथे बैठक व्यवस्था
नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांचा उपक्रम

परभणी ः प्रभाग क्रमांक पाचचे शिवसेनेचे नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी महिलांसाठी ठिकठिकाणी बैठक व्यवस्थेचा उपक्रम हाती घेतला असून प्रभागातील पिठाच्या गिरण्या, मंदिरे आदी परिसरात हे सिटर बसविले जात आहेत.

जनाई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चंद्रकांत शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. स्वतः किरायाच्या दोन खोल्यांत राहणारे शिंदे नगरसेवक होण्यापूर्वीपासून पदरमोड करून टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी वितरण, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

हेही वाचा - महाशिवरात्री व्हिडिओ :  शिवालये गजबजली भाविक भक्तांनी

पशूंसाठी बनवले पाणवठे 
प्रभागात पशूंसाठी पाणवठे म्हणून त्यांनी अनेकांच्या घरासमोर, मंदिरांसमोर सिमेंटचे हौददेखील उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच त्यांनी नागरिकांच्या नाली तुंबल्याच्या, कचरा साठल्याच्या तक्रारी आल्यास व पालिकेचे कामगार उपलब्ध न झाल्यास खासगी कामाठी लावून काम करून घेत असल्याचेदेखील दिसून येते.

हेही वाचा - महाशिवरात्री व्हिडिओ : औंढा नागनाथला भाविकांची दर्शनासाठी गर्दी

खास महिलांसाठी बैठक व्यवस्था
प्रभागात अनेक पिठाच्या गिरण्या असून तेथे महिला दळण दळणासाठी आल्या असताना किती तरी वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली. प्रत्येक गिरणीसमोर महिलांना बसण्यासाठी त्यांनी एक सिटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर प्रभागातील मंदिरांकडूनदेखील सिटर देण्याची मागणी ते पूर्ण करीत आहेत. 

सामाजिक भावनेतून सेवा करतात उपलब्ध 
किमान ५० सिटर ते खरेदी करणार असून प्रत्येकी तीन हजार, असे जवळपास दीड लाख रुपये ते स्वतः खर्च करणार आहेत. विशेष म्हणजे, उधार-उसणवारीवर ते हे साहित्य घेत आहेत. महापालिकेत अनेक नगरसेवक असून त्यापैकी काही जण किरकोळ कामे स्वतः खर्च करून करतात. त्यामध्ये श्री. शिंदे यांचा अग्रक्रम आहे. त्यातही बेताचीच परिस्थिती असतांनादेखील सामाजिक भावनेतून ते या सेवा उपलब्ध करून देत आहेत. प्रभागातील किरकोळ वाटणाऱ्या समस्या प्रादान्याने सोडविण्याचे काम ते करत आहेत. 

नागरिकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ
आपण फार सामान्य व छोटे नगरसेवक आहोत. पक्षाचे धोरणच समाजकारणाचे असल्यामुळे पाठबळ, प्रोत्साहन मिळते. प्रभागातील नागरिकांसाठी काहीतरी करावे ही नेहमीच तळमळ असते. जे-जे शक्य होईल, ते-ते करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे, यावर आपला विश्वास आहे. - चंद्रकांत शिंदे, नगरसेवक, प्रभाग पाच, परभणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A corporation's initiative for women's seating