सोळा कोटींचा भ्रष्टाचार, मुख्य आरोपींवर कारवाई करा - विनायक मेटे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

मनरेगाअंतर्गत १६ ते १७ कोटी रुपयांची वेगवेगळी बोगस कामे भ्रष्टाचार कारण्यासाठी ऑनलाइन केली. या प्रकरणात राजकीय लोकांसह संबंधित इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

बीड - बीड पंचायत समितीमध्ये मनरेगाअंतर्गत १६ ते १७ कोटी रुपयांची वेगवेगळी बोगस कामे भ्रष्टाचार कारण्यासाठी ऑनलाइन केली. या प्रकरणात छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली गेली. मात्र यात सहभागी असणारे पदाधिकारी व राजकीय लोकांसह संबंधित इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

श्री. मेटे यांनी याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. याप्रकरणी केलेल्या चौकशीत अनियमितता आढळल्याने तिघांच्या सेवा समाप्त करून गुन्हे नोंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणाला वरदहस्त देणारे राजकीय नेते, या विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे विनायक मेटे म्हणाले.

हेही वाचा -परजिल्ह्यात मुलीचे लग्न लावून बीड जिल्ह्यात आले

या घटनेला महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने चौकशीच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा तर प्रकार होणार नाही ना, अशी शंकाही येत असल्याचे मेटे म्हणाले. सर्वांनी संगनमताने शासनाला फसविले आहे. चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे नोंद करा, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली. बीडमध्ये भ्रष्ट आचरण करणाऱ्यांना कडक शासन आवश्यक आहे. जिल्ह्याची प्रतिमा यामुळे वारंवार मलिन झालेली आहे. भ्रष्टाचारात जर लोकप्रतिनिधींचा सहभाग असेल तरीही कारवाई करायला हवीच. कायद्याचे राज्य जनतेस अपेक्षित आहे, असेही विनायक मेटे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption of Rs 16 crore, take action against main accused - Vinayak Mete