यंदा कपाशीपेक्षा मकाच बरा!

योगेश सारंगधर
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद - एकरी खर्च पंचवीस हजार अन्‌ उत्पन्न सतरा हजार पदरात पाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा कपाशीकडे पाठ फिरवून मका, बाजरी, एरंडी पिकाच्या लागवडीस पसंती दिली आहे. बोंडअळीच्या हल्ल्याने एकरी सरासरी दहा क्विंटल होणारा कापूस फक्त तीन क्विंटलवर आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.

औरंगाबाद - एकरी खर्च पंचवीस हजार अन्‌ उत्पन्न सतरा हजार पदरात पाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा कपाशीकडे पाठ फिरवून मका, बाजरी, एरंडी पिकाच्या लागवडीस पसंती दिली आहे. बोंडअळीच्या हल्ल्याने एकरी सरासरी दहा क्विंटल होणारा कापूस फक्त तीन क्विंटलवर आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपात मुख्यत्वे कपाशीचे पीक घेतले जाते. यानंतर मका, बाजरीला शेतकरी पसंती देतात. गेल्या वर्षी विस्कळित पाऊस झाला. त्यात हवामानही बदलत राहिल्याने पिकांवर विपरीत परिणाम झाला. कपाशी हमखास उत्पन्न देणारे असते; परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने एकरी फक्त तीन क्विंटलपर्यंत कापूस निघाला. ज्या शेतकऱ्यांनी फवारणीसह काळजी घेतली, त्यांना जास्तीत जास्त सात क्विंटलपर्यंत उत्पन्न हाती आले आहे. 

यंदा कपाशीचे क्षेत्र सरासरी तीस टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. मक्‍याची लागवड वाढली आहे. मका एकरी पंचवीस क्विंटलपर्यंत होतो. गेल्या हंगामात अकराशेचा भाव मिळाला; मात्र मक्‍याचा उत्पादन खर्च कमी आहे. चाराही विकला जातो. मेहनत कमी अन्‌ उत्पन्न हमीचे असल्याने मक्‍याला पसंती आहे.

सध्या पिके जगतील एवढा पाऊस अधूनमधून येत आहे. नद्या-नाल्या वाहिल्या नसल्या तरी जमिनीत ओल असल्याने पिके तग धरून आहेत. पाऊस चांगला कोसळला नसला, तरी शेतकरी आशेवर आहेत. शेतकरी जास्त जोखमीची पिके न घेता सहज उत्पन्न देणारी पिके घेऊ लागला आहे.

कपाशीचा खर्च
औषध फवारणी - १०,०००
रासायनिक खते - ५,०००
मशागत - ५,०००
पऱ्हाट्या उपटणे - २,०००
कापूस वेचणी - सहा रुपये किलो

कपाशीचे एकरी उत्पन्न
बोंडअळी प्रादुर्भाव - तीन क्विंटल
रोगविरहित शेत - सात क्विंटल
सरासरी भाव - ४,२०० ते ४,५००

‘‘एरंडीचे तेल बनविण्यासाठी बियाणांचा वापर होतो. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव ही एरंडीची मोठी बाजारपेठ आहे. कन्नड तालुक्‍यातील चापानेर परिसरात जवळपास यंदा दोनशे एकरवर एरंडीची लागवड झालेली आहे. गावरान बियाणाकडे कल वाढला आहे. मी पारंपरिक पिके न घेता एरंडी लावली आहे. ’’
- अजय जाधव, खेडा

एरंडीचे फायदेशीर गणित
कपाशीचा सत्तर टक्के खर्च आणि तीस टक्के उत्पन्न आहे. त्यातही हमी नाही. मात्र, एरंडीचे पीक किफायतशीर ठरत आहे. एरंडीचे सहा महिन्यांत एकरी पंधरा क्‍लिंटल उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी चार ते साडेचार हजारांपर्यंत भाव मिळाला. सरासरी तीन हजार भाव हमखास असतो. हायब्रीड बियाणे पाचशे ते बाराशे रुपये किलो आहे. एकरी अर्धा किलो बियाणे लागते. फुलोऱ्यात असताना केवळ पाचशे रुपयांपर्यंत फवारणीचा खर्च येतो. गावरान बियाणे चाळीस रुपये किलो आहे. किलोभर बियाणे लावल्यास वर्षभर एरंडीच्या बिया येत राहतात.

अद्रकाने खाल्ला भाव
अद्रक पिकाला गेल्या सहा वर्षांपासून भाव नव्हता. सातशे-आठशे क्विंटलचा भाव असलेल्या अद्रकला मात्र साडेतीन हजार ते पाच हजारांपर्यंत भाव मिळाला. क्षेत्र कमी असल्याने मोजक्‍याच शेतकऱ्यांना फायदा झाला असली, तरी अद्रक पिकाकडेही यंदा कल वाढला आहे.

Web Title: cotton maize agriculture