कापूस घरातच पिवळा पडण्याचा धोका

कैलास चव्हाण
Sunday, 12 April 2020

लॉकडाउनमुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबल्याने फटका

परभणी : लॉकडाउनमुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबल्याने अखेरच्या टप्प्यातील तूर, कापूस खरेदीला फटका बसला आहे. अन्य जिल्ह्यात खरेदी सुरू असताना परभणी जिल्ह्यात मात्र खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना कापूस जपण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांना ठेवायाला जागा नसल्याने घरात अडचणीत धोका पत्करून कापूस ठेवण्याची वेळ आली आहे.

परभणी जिल्ह्यात १९ लाख ६१ हजार १४०.०५ क्विंटल अशी कापूस खरेदी झाली आहे. त्यामध्ये राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडून १३ केंद्रांवर आतापर्यंत पाच लाख ३५ हजार ३५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. भारतीय कापूस निगम महामंडळ अर्थात सीसीआयच्या परभणी जिल्ह्यातील सात केंद्रांतर्गत आठ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, परभणी जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्यांनी पाच लाख ९३ हजार ९८३ क्विंटल कापूस खरेदी केली आहे. त्यानंतर आलेला पाऊस आणि कोरोनाचे संकट यामुळे खरेदी बंद करण्यात आली आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याची माहिती आहे. तसेच तुरीचीदेखील खरेदी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे तूरही शिल्लक आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीचे ऑनलाइन धडे

गोदामाची व्यवस्था नसल्याने घरातच साठवणूक

अनेक शेतकऱ्यांची लहान घरे आहेत. गोदामाची व्यवस्था नसल्याने घरातच त्यांनी शेतमालाची साठवणूक केलेली आहे. सध्या लॉकडाउनमुळे शेती किंवा घरीच बसावे लागत आहे. त्यात घरात असलेल्या शेतमाल हा अडचणीला ठरू लागला आहे. अल्पभूधाकर शेतकऱ्यांना अधिक दिवस शेतमाल घरात ठेवणे शक्य नसते. त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर शेतमाल विक्री करावा लागतो. सुरवातीला भाव नसल्याने शेतमाल विक्री केला नाही, पुढे खरेदी केंद्रावर लागलेल्या रांगा पाहता अनेक शेतकऱ्यांनी गर्दी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु, लॉकडाउनमुळे आता कापूस, तूर जपण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - मदत कार्यात बचत गटही सरसावले !

कापूस घरात ठेवणे धोक्याचे
कापूस हा ज्वलनशील असल्याने आणि सध्या उन्हाचा कडाका तापू लागल्याने राहत्या घरात कापूस ठेवणे धोक्याचे आहे. तसेच जास्त दिवस कापूस घरात ठेवल्यास पिवळा पडतो. त्यामुळे विक्री करताना अडचण होणार आहे. त्यामुळे किमान कापूस खरेदी केंद्र तरी सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton is at risk of becoming yellow in the house,parbhani news