esakal | बैलजोडी, बैलगाडीसह दांपत्य गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कुंडलिक असोले यांना ओढ्यामधून बैलगाडी न नेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी हा सल्ला धुडकावून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलगाडी पाण्यामध्ये वाहत चालल्याचे पाहून ओढ्या शेजारी असलेल्या तिघांनी आरडाओरडा करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

बैलजोडी, बैलगाडीसह दांपत्य गेले वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी (जि. हिंगोली) : दळण घेऊन बैलगाडीमधून शेतातील आखाड्यावर निघालेल्या शेतकरी दांपत्य ओढ्याला आलेल्या पुरामध्ये बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस कर्मचारी व नागरिकांनी शोध घेतला असता बैलगाडी व बैल सापडले, तर शेतकरी दांपत्याचा शोध सुरू होता.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील अप्पाराव शिंदे यांचे पुयना तलाव (ता.कळमनुरी) परिसरात शेत आहे. शेतातील आखाड्यावर त्यांचे गडी कुंडलिक असोले (वय ५५) व पत्नी द्रोपदाबाई (वय ४७) हे कुटुंबीयांसह राहतात. 

हेही वाचा - चार लाख क्विंटल कापसाची खरेदी -

ओढा पार करून जात होते

शुक्रवारी दुपारी दळण व इतर कामासाठी ते बैलगाडी घेऊन पत्नीसह कळमनुरी येथे आले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बैलगाडीवरून ते आखाड्यावर निघाले होते. सायंकाळच्या सुमाराला शहर व परिसरात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या ओढ्याला पाणी आले होते. कुंडलिक आसोले हे ओढा पार करून जात होते.

बैलगाडी न नेण्याचा सल्ला दिला 

 ओढ्याच्या शेजारी असलेल्या लिंबा शिरसागर, ज्ञानू क्षीरसागर, बालाजी जांबुतकर यांनीही कुंडलिक असोले यांना ओढ्यामधून बैलगाडी न नेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी हा सल्ला धुडकावून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलगाडी पाण्यामध्ये वाहत चालल्याचे पाहून ओढ्या शेजारी असलेल्या तिघांनी आरडाओरडा करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू 

 श्री. आसोले दांपत्य बैलगाडीसह वाहून गेले. ही माहिती मिळताच नगरसेवक शिंदे, पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी अहमद पठाण, गणाजी पोटे आदींनी धाव घेत शोध घेतला. या वेळी काही अंतरावर बैलगाडी व दोन्ही बैल सुखरूप आढळून आले. मात्र, कुंडलिक आसोले त्यांच्या पत्नीचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता. या परिसरातून वाहणारा ओढा पुढे पुयना तलावाला जाऊन मिळतो.

नवरदेवास लग्न करणे पडले महागात

वारंगाफाटा : एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या वारंगा फाटा येथील पाच जणांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१९) गुन्हा दाखल झाला आहे. यात नवरदेवाचाही समावेश आहे.

येथे क्लिक कराआता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -

नातेवाइकांनी लावून दिला अल्पवयीन मुलीचा विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंगा फाटा येथील एका सोळा वर्षे सहा महिने वय असलेल्या मुलीचा विवाह तिच्या नातेवाइकांनी गंगाखेड येथील राजेश कंठाळे यांच्यासोबत सोमवारी (ता. १५) लावून दिला. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी यासंदर्भात बालविवाह प्रतिबंध समितीचे अधिकारी बालाजी शिंदे यांना माहिती दिली.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 त्यावरून श्री. शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीमध्ये सदर वधू अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. वारंगा फाटा येथील ग्रामसेवक गोरखनाथ कोटेवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव राजेश कंठाळे यांच्यासोबत विष्णू पवार, गजानन शिंदे व अन्य दोघांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार शेख बाबर पुढील तपास करीत आहेत.