आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

संजय कापसे
Thursday, 18 June 2020

कृषी विभागाकडून आता बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम हाती घेतले आहे. गुरुवार (ता.१८) तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी भानुदास जेवे, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक आर. एम. गवळी यांनी माळेगाव व परिसरात प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली.

कळमनुरी(जि. हिंगोली) : खरीप हंगामात सोयाबीन पेरणीसाठी खरेदी केलेले बियाणे पेरणीनंतर अनेक ठिकाणी उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र संबंधित व्यापारी व कृषी कार्यालयाकडून पेरणीनंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत बियाणाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

तालुक्‍यात मृग नक्षत्रात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात केली आहे. तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचे लागवड क्षेत्र मोठे असून बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर हमखास येणारे पीक म्हणून सोयाबीनला पिकाला प्राधान्य देत आहेत.

हेही वाचाअजबच... शाखा नसलेल्या बॅंकेला जोडले गाव -

पावसाने लावली हजेरी 

 या वर्षी मृग नक्षत्रामध्ये काही भागात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे बियाणे पेरणीसाठी वापरले आहे. मात्र पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. 

नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम

त्यामुळे कृषी विभागाकडून आता या बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम हाती घेतले आहे. गुरुवार (ता.१८) तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी भानुदास जेवे, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक आर. एम. गवळी यांनी माळेगाव व परिसरात प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली.

मोठ्या पावसामुळे बियाणे उगवले नाही

 दुसऱ्या बाजूला कृषी विभागाने बियाणे विक्रेत्यांकडून सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी नमुने हाती घेतले आहेत. शनिवार (ता.१३) झालेल्या मोठ्या पावसामुळे पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणे उगवल्याचे तपासणीनंतर समोर येणार असले तरी आता मात्र, शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर सोयाबीन पेरणी केलेल्या शेतीची पाहणी केली जाणार आहे. विक्रेत्यांकडून बियाणे नमुने तपासणीसाठी घेत सीड टेस्टिंग लॅबरोटरी परभणी येथे पाठविण्यात येणार आहेत.
-गजानंद पवार, तालुका कृषी अधिकारी

येथे क्लिक कराकोरोनाने रोखली ‘जलयुक्त’ची १३३ कामे -

खत, बियाणांची वाढीव दराने विक्री

औंढा नागनाथ : तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केलेली आहे. मात्र, काही कृषी केंद्रचालक खत, बियाणांची वाढीव दराने विक्री करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

कृषी विभागाचे खत बांधावर मिळेना

औंढा शहरासह तालुक्यातील जवळा बाजार, साळणा, शिरडशहापूर, सिद्धेश्वर, येहळेगाव सोळंके, पिंपळदरी, जामगव्हाण आदी गावांत कृषी केंद्र आहेत. येथेही वाढीव दराने बियाणे, खताची विक्री केली जात असल्याचा आरोप होत आहे. बांधावर खत देणार असल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना खतच मिळत नसल्याची ओरडही होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now The Crisis Of Double Sowing On Farmers Hingoli News