esakal | बीड जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा उसळी; २४ तासांत २३८ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

beed

बीड जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा उसळी; २४ तासांत २३८ नवीन रुग्ण

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: आष्टी, पाटोदा, गेवराई व शिरूर कासार या चार तालुक्यांत कडक निर्बंधानंतरही कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतीच आहे. बुधवारीही (ता. २१) रुग्णसंख्येने सव्वादोनशेचा पल्ला पार केला. नवीन २३८ रुग्ण आढळून आले तर म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराचा एक रुग्ण व एका मृत्यूची भर पडली. मंगळवारी पाच हजार ३७४ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यामध्ये २३८ पॉझिटिव्ह तर पाच हजार १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये सर्वाधिक ५७ रुग्ण आष्टी तालुक्यात आढळले. तर अंबाजोगाई तालुक्यात ११, बीडमध्ये ३७, धारुर १३, गेवराई ३३, केज १४, माजलगाव सात, पाटोदा ३६, शिरूर २१ व वडवणी तालुक्यात नऊ रुग्णांचा समावेश आहे. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण मंगळवारपेक्षा कमी झाले.

मंगळवारी सहाच्या घरात असलेला पॉझिटिव्हिटी रेट बुधवारी ४.४२ असा खाली आला. बुधवारी दिवसभरात १५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ तासांत नवीन एकही कोरोना मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आतापर्यंत दोन हजार ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९५ हजार ३७४ इतकी झाली असून आतापर्यंत ९१ हजार ३९२ जण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात एक हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.

हेही वाचा: २१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!

दरम्यान, म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत बुधवारी आणखी एका रुग्णाची व एका मृत्यूची भर पडली. आणखी १३ रुग्णांना उपचारानंतर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २०२ रुग्ण आढळून आले. यापैकी १३३ जण उपचारानंतर बरे झाले. सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

loading image