esakal | Covid-19| 'गरज नसताना रेमडेसिव्हिर दिल्यास कारवाई'

बोलून बातमी शोधा

remdesivir

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा आहे

Covid-19| 'गरज नसताना रेमडेसिव्हिर दिल्यास कारवाई'
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: गरज नसताना कोरोना रुग्णाला रेमडेसिव्हिर औषध घेण्याचा सल्ला दिल्याचे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी (ता. १२) फिजिशियन डॉक्टरांना भरला. आपत्ती व्यवस्थापन व अन्य कायद्यानुसार तसे आदेशही काढण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले. यातून रेमडेसिव्हिर औषधाच्या तुटवड्यातील गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला तरी तो किती यशस्वी होतो, ते येणारा काळच ठरवणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा आहे. तुटवड्याचा फायदा घेऊन विक्रेत्यांनी औषधाचा काळाबाजार सुरू केला. यामुळे गरजू रुग्णांना औषध मिळणे दुरापास्त झाले. यामुळेच औषधांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या हाती घेऊन दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तेव्हापासून रुग्णालयांकडून औषधांची मागणी घेऊन वितरकाकडे पाठवण्यात येत आहे. वितरकाकडून आलेले औषध मागणीच्या प्रमाणात रुग्णालयांना देण्यात येत आहे. यात प्राधान्याने व्हेंटीलेटर असलेल्या रुग्णांना औषधीचा पुरवठा करण्यात येत असून, त्यानंतर आयसीयूतील रुग्णांना प्राधान्य देण्यात येत आहे.

Corona virus| वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

तरीही मागणीच्या तुलनेत औषधी कमी पडत असून, फिजिशियन डॉक्टरांकडून गरज नसलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिरचा सल्ला देण्यात येत असल्यानेच हा गोंधळ उडाला आहे. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊन रुग्णांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सोमवारी जिल्ह्यातील फिजिशियन डॉक्टरांची बैठक घेतली. त्यांना कोरोना रुग्णांवरील सरकारचा उपचाराचा प्रोटोकॉल सांगितला. यामुळे गरज नसताना रुग्णांना रेमडेसिव्हिर घेण्याचा सल्ला देऊ नका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना बजावले. 

आता नोंदणीकृत रुग्णालयांनाच औषध-
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयाला आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागते. केवळ अर्धा तासात ही नोंदणी होते. अशा नोंदणीकृत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रशासनाकडून रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी नोंदणी न केलेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी एक पाऊल मागे घेत प्रशासनाने हे औषध उपलब्ध करून दिले होते. मात्र, सोमवारी पुन्हा हे पाऊल पुढे रेटत नोंदणी केलेल्या रुग्णालयांनाच रेमडेसिव्हीरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले. सध्या नोंदणीकृत रूग्णालयाची संख्या २१ वरून ३४ झाली आहे. 

थरार! सहा वर्षीय शौर्यला सोडवण्यासाठी पोलिसांना विकावी लागली पाणीपुरी...

रेमडेसिव्हिरची सोमवारची स्थिती 
- उपचार घेणारे रुग्ण - ९९८ 
- आयसीयूमधील रुग्ण - ३०३ 
- व्हेंटीलेटरवरील रुग्ण - ११० 
- सोमवारी उपलब्ध रेमडेसिव्हिर - ३१६ 
- व्हेंटीलेटरवरील रुग्णांसाठी - ११० 
- आयसीयूमधील रुग्णांसाठी - २०६ 

डॉक्टरांनी दिलेल्या रेमडेसिव्हीरच्या सल्ल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यात गरज नसताना रेमडेसिव्हिरचा सल्ला दिल्याचे आढळून आल्यास डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडेही उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिव्हिरबाबत असलेल्या परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे. 
- पृथ्वीराज बी. पी., जिल्हाधिकारी, लातूर. 

(edited by- pramod sarawale)