Coronavirus : बीडकरांनो, नो टेन्शन! जिल्ह्यात साकारतेय नवे कोविड हॉस्पिटल

दत्ता देशमुख
Thursday, 9 July 2020

अंबाजोगाई परिसरातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय, मानसिक आजार व वृद्धत्व आधार केंद्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हे रुग्णालय उभारले जात आहे.

बीड : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा विचार करून उपचाराचे नियोजन केले जात आहे. आजघडीला जिल्हा रुग्णालयात साडेतीनशे व अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात असणाऱ्या ३०० अशी सहाशे खाटांची व्यवस्था आहे. दरम्यान, ऑगस्टच्या मध्यात आणखी आठशे खाटांच्या रुग्णालयाची भर पडणार आहे. त्यामुळे एकट्या अंबाजोगाई परिसरात १,४०० कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे. 

अंबाजोगाई परिसरातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय, मानसिक आजार व वृद्धत्व आधार केंद्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हे रुग्णालय उभारले जात आहे. एकाच ठिकाणी केवळ कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी आठशे खाटा आणि बाजूलाच अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अशी दुहेरी उपचाराची सोय होत आहे. मात्र, या रुग्णालयाचे
काम वेगात असले तरी हे रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी १५ ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  

यापूर्वी माजलगाव, केज व परळी या उपजिल्हा रुग्णालयांतही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत. मात्र, भविष्यात रुग्णांचा आकडा वाढला तर अशा रुग्णांच्या उपचाराची सोय करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लोखंडी सावरगाव येथे रुग्णालय उभारत आहे. 
  
जवळच वैद्यकीय महाविद्यालय 
या ठिकाणी मुळातच सुसज्ज इमारत आहे. एकाच छताखाली आठशे कोविड रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय उभारत आहे. विशेष म्हणजे बाजूलाच आणखी तीनशे खाटांचे कोविड केअर सेंटर असून, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातही ३०० खाटांचे कोविड रुग्णालय आहे.

मुळातच इमारत असल्याने इथे कोविड रुग्णालय उभारणे अधिक सोयीचे झाले आहे. या ठिकाणी सोनोग्राफी मशीन, एक्स-रे मशीन, प्रयोगशाळा अशा आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपकरणांसह आयसीयू, व्हेंटिलेटर असलेले सुसज्ज रुग्णालय असेल. ऑक्सिजन प्लँटचे काम वेगात आहे. प्रयोगशाळेची उपकरणेही दाखल झाली आहेत. सक्शन लाइन व ऑक्सिजन लाइनचे काम पूर्ण झाले आहे. आलेल्या उपकरणांची उभारणी या पंधरवड्यात पूर्ण होईल असा अंदाज आहे. मात्र, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर व विद्युत जनरेटरची उभारणी करून रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडू शकतो. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  
  
जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमित पाठपुरावा 
या रुग्णालयाच्या उभारणीच्या कामात आरोग्य विभागासह महावितरण, बांधकाम आदी विभागांचीही कामे आहेत. या विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून नियमित पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे इतर विभागांकडूनही कामांना वेग आला आहे. यासह आरोग्य विभागाला या रुग्णालयासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठीही जिल्हाधिकाऱ्यांकडून गरजेनुसार मान्यता दिली जात आहे. 
  

उपकरणे बसविणे, खाटांची अॅरेंजमेंट, ऑक्सिजन प्लँट ही कामे साधारण या महिनाअखेर पूर्ण होतील. विद्युत विभाग व बांधकाम विभागाच्या काही कामांना वेळ लागणार असला तरी ऑगस्टच्या मध्यापर्यंत येथील कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत. 
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक बीड.  
 
 

(संपादन : विकास देशमुख) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Hospital at Lokhandi Savargaon Beed District