क्रिकेटचा सर्वात मोठा सट्टा नांदेडच्या या बारमधून

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

नांदेड पोलिसांनी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बारमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा व कल्याण नावाच्या जुगारावर छापा टाकला. यावेळी पोलिसानी नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.  

नांदेड : शहरात मटका व जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असतानाच पोलिसांनी एका बारमध्ये छापा टाकून सट्टा जुगारावर कारवाई केली. यावेळी पोलिसानी तिघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. पाच) मालेगाव रस्त्यावर असलेल्या गॅलक्सी बारमध्ये केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव रस्त्यावरील हॉटेल गॅलेक्सी बारमध्ये हा क्रिकेट साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड असा सट्टा बाजार सुरू होता. याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला.

यावेळी त्यांनी या सट्टा बहाद्दरांकडून नगदी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एक लाख ५१ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हवालदार भानुदास वडजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात जावेद चाऊस शादुल चाऊस, शेख अहेमद शेख नवाब आणि शैलेश रामप्रसाद गट्टाणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एल. बोणवाड करत आहेत.

हेही वाचा‘त्या’ घटनेतुन पीडित कुटुंब अजूनही सावरले नाही

मटका बुक्कीवरून सहा जणांना अटक

नांदेड : कल्याण मटका बुक्कीवर कारवाई करून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विशेष पोलिस पथकाने छत्रपती चौक परिसरातील आरएमआर प्लाझा येथे बुधवारी (ता. पाच) सायंकाळच्या सुमारास केली.
 
छत्रपती चौक परिसरातील आरएमआर प्लाझामध्ये मागील काही दिवसापासून कल्याण नावाचा मटका चालत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना मिळाली. त्यांनी आपल्या विशेष पथकाचे फौजदार दशरथ आडे यांना या कारवाईच्या सुचना दिल्या. श्री. आडे यांनी गोपनिय माहिती काढत अखेर या मटका बुक्कीवर बुधवारी कारवाई केली. 

एक लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त

यावेळी पोलिसांनी अनिल मुंकुदराव तारु, नितीन रमाकांत हटकर, सुर्यकांत रामचंद्र गायकवाड, सचीन दिगंबर कांबळे, दीपक संभाजी देशमाने आणि सुमित शामराव गायकवाड यांना ताब्यात घेतले. मटका बुक्कीवरून नगदी ११ हजार ४०० रुपये, ४० हजार ३०० रुपयाचे मोबाईल आणि एक लाख ३० हजाराच्या दुचाकी असा एक लाख ८१ हजार ७८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. फौजदार दशरथ आडे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक जी. एम. मंगनाळे करत आहेत. 

येथे क्लिक करा`मास्तर’ तुम्ही तुमचीच इभ्रत...

भाग्यनगर पोलिस बेसावध 

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगारासह आता तर थेट बारमधून क्रिकेटवर सट्टा हा जुगार खेळविल्या जात असल्याची धक्कादायक माहिती कारवाईनंतर पुढे आली. हा प्रकार स्थानिक पोलिसांना माहित होता किंवा नव्हता हे मात्र समजु शकले नाही. परंतु पोलिस अधिक्षक यांच्या पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाया झाल्याने भाग्यनगर पोलिसांना वरिष्ठांच्या कामपिचक्या घ्याव्या लागणार आहेत. या दोन्ही कारवाईबाबत पोलिस बेसावध राहिल्याचे पहावयास मिळते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket speculates in Nandeds bar nanded news