तू मला फोनवर बोलत जा अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन...पिता-पुत्रावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो अशोक रामभाऊ नागरगोजे (वय ३५) याने आपल्या मोबाईलमध्ये काढले. त्याआधारे तो तिला पाच महिन्यांपासून ब्लॅकमेल करीत असे. नंतर त्याने तिला एक मोबाईल दिला व त्यावर तो तिच्याशी बोलत असे.

धारूर (जि. बीड) -‘तू मला फोनवर बोलत जा; अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन’ अशी धमकी देत ब्लॅकमेल केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी तब्बल २३ दिवसांनंतर पिता-पुत्रावर धारूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. 

तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो अशोक रामभाऊ नागरगोजे (वय ३५) याने आपल्या मोबाईलमध्ये काढले. त्याआधारे तो तिला पाच महिन्यांपासून ब्लॅकमेल करीत असे. नंतर त्याने तिला एक मोबाईल दिला व त्यावर तो तिच्याशी बोलत असे. ‘तू जर मला फोनवर बोलली नाही तर माझ्याकडील तुझे फोटो गावात व तुझ्या नातेवाइकांना दाखवीन’ अशी धमकीही त्याने दिली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन केले.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

उपचारादरम्यान तिचा १८ एप्रिलला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यू झाला. मृत मुलीच्या नातेवाइकांनी ११ मे रोजी धारूर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अशोक रामभाऊ नागरगोजे व रामभाऊ गिन्यानदेव नागरगोजे यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक सुरेखा धस यांनी सांगितले. तपासात बाललैंगिक अत्याचार व विनयभंगाचे कलम वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against father and son in Dharur