
Crime News : खाकी वर्दीची कमाल! 32 वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणातील आरोपीला अखेर अटक
लोहगाव : ३२ वर्षांपूर्वी बिडकीन पोलिस ठाणेअंतर्गत गाढेगाव गंगापूर येथील शेतवस्तीवरील दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी वेषांतर करून भालगाव (ता.नेवासा) येथून शिताफीने जेरबंद केले आहे. अशोक विनायक बर्डे असे या आरोपीचे नाव असून तो स्वत:चे नाव अंस्तित्व व ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गाढेगाव येथील मुरलीधर एकनाथ चनघटे यांचे शेतवस्तीवर ता. १५/१०/१९९१ रोजी रात्री दीडच्या सुमारास पाच अज्ञात दरोडेखोरांनी अचानक लाठ्या, काठ्या, गज, कुऱ्हाडीने फिर्यादीसह पत्नी, चुलती व शेतवस्तीवर राहणारे सुरेश पवार, रमेश पवार यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, घड्याळ व इतर साहित्य असे एकूण ३२५०/- रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरदस्तीने चोरून नेला होता.
या प्रकरणी बिडकीन ठाण्यात गुन्हा नोंद होता. या दरोड्याचा तत्कालीन पोलिसांनी तपास करून पाच आरोपींना निष्पन्न करून आरोपी मनोहर संपत बर्डे, अंताराम मनोहर बर्डे (रा. कमलापूर ता. श्रीरामपूर), ओंकार दगडू माळी (रा.खलाल पिंपी जि. अ.नगर) यांना अटक करण्यात यश आले होते. परंतु यातील आरोपी अशोक विनायक बर्डे व सुभाष बाबूराव बर्डे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. परंतु आरोपी मागील ३२ वर्षांपासून वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलून गुंगारा देत होता.
अखेर आरोपी शोधमोहिमेत बिडकीन पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी अशोक विनायक बर्डे हा पुणतांबा, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील वीटभट्टीवर स्वतःचे नाव तुकाराम असे धारण करून मजुरीचे काम करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पुणतांबा येथील वीटभटीवर आरोपीचा शोध सुरू असताना त्याला सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढला.
तरीही पोलिसांनी त्याचा माग सोडला नाही. अशोक हा त्याच्या मूळ गावी भालगाव येथे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळताच (ता.६) मध्यरात्री आरोपीच्या घरपरिसरात वेषांतर करून अचानक झडप घालून त्याला जेरबंद केले.
ही कारवाई मनीष कलवानिया, सुनील लांजेवार, डॉ. सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय अधिकारी, पैठण, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, फौजदार मनेष जाधव, पोलिस अंमलदार संदीप धनेधर, अमोल मगर यांनी केली.