"युतीत मिठाचा खडा टाकू नका! ...अन्यथा पदाचा राजीनामा देईन"; खासदार श्रीकांत शिंदेंच्या विधानाची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Shinde

"युतीत मिठाचा खडा टाकू नका! ...अन्यथा पदाचा राजीनामा देईन"; खासदार श्रीकांत शिंदेंच्या विधानाची चर्चा

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या एका विधानामुळं चर्चेत आले आहेत. मतदारसंघातील काही जणांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना युतीत मिठाचा खडा टाकू नका. तसेच तर मी पदाचा राजीनामा देईल असं विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं भलतीच चर्चा सुरु झाली आहे. (otherwise I will resign says statement by MP Shrikant Shinde)

काय आहे नेमकं प्रकरण?

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजप ठरवणार असल्याचं विधान एका भाजपच्या महिलेनं केलं होतं. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मी सोशल मीडियावर स्टेटमेंट्स ऐकली आहेत. मला वाटतं वरिष्ठ पातळीवर उमेदवार कोण असेल हे ठरेल. जो योग्य असेल त्याला उमेदवारी देतील.

पण मला एवढंच सांगायचं आहे की, ही युती वेगळ्या विचारानं झालेली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा असतील आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असतील यांनी एका विचारानं युती महाराष्ट्रात केली. युती झाल्यानंतर सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम इथं होत आहे. (Marathi Tajya Batmya)

...तर काय परिणाम झाले असते याचा विचार करावा

"मला वाटतं कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरुन ठराव करतात की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही. यासाठी कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू असंही ते बोलतात. अशी आव्हान आपण विचारपूर्वक दिली पाहिजेत. आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करु नये.

कारण मुख्यमंत्री शिदेंनी दहा महिन्यापूर्वी मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली जे केलं, मला वाटतं याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. तसेच हे पाऊल उचललं नसतं तर त्याचे काय परिणाम झाले असते याचाही विचार त्यांनी केला पाहिजे" (Latest Marathi News)

मोदींसाठी काम करा

गेल्या ९ वर्षात मला कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकांनी मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं. तेव्हापासून दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतो आहे. निधीचा विषय किंवा इतर विकासकामं एवढं सगळं चांगलं काम सुरु असताना युतीत मिठाचा खडा टाकता कामा नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यासाठी कार्य केलं पाहिजे, कुठलाही स्वार्थ ठेवता कामा नये.

...तर मी राजीनामा देईन

मला कुठलाही स्वार्थ नाही, मला कोणी सांगितलं की कल्याण लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा द्या तर मी देईन आणि पक्षाचं आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. दुसरा कोणताही उमेदवार इथं असेल तर त्याला निवडून देण्यासाठी मी काम करेन. आमचा उद्देश एकच आहे २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, यात कुठलाही स्वार्थ नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.