
Crime News : 'ईडी'चा अधिकारी असल्याचे सांगत वृद्धेची ५० हजारांची फसवणूक; गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला एकाने ‘मी ईडी अधिकारी असून तुमच्या गुडघ्याच्या आणि तुमच्या पतीच्या ॲन्जीओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेसाठी १० लाख रुपये मिळवून देतो’, असे आमिष दाखवून डॉक्टरांची फी म्हणून वृद्धेच्या फोनपे वरून ५० हजार मागवून घेतले. मात्र, खात्यात दहा लाख रुपये न आल्याने अखेर वृद्धेने पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.
त्यावरुन अमोल विजय पाटील नावाच्या व्यक्तीविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्मिता अरविंद देशपांडे (६७, रा. मिल कॉलनी, खडकेश्वर रस्ता, कोतवालपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या १५ मे रोजी सकाळी सात वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे सिद्धार्थ उद्यान परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या.
दरम्यान त्यांना एक व्यक्ती भेटला. त्याने अमोल विजय पाटील असे नाव सांगत मी ईडी अधिकारी असून सरकारी सहायता निधीच्या सर्व योजनांची मला माहिती आहे. त्या कार्यालयात माझ्या भरपूर ओळखी आहेत. मी तुम्हाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देऊ शकतो.
तसेच तुमच्या पतीच्या ॲन्जीओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेसाठीही हा निधी मिळवून देवू शकतो, त्यातून तुम्हाला दोन्ही मिळून १० लाख रुपये मिळतील, हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील अशी त्याने वृद्धेस खात्री दिली. फक्त त्यासाठी तुम्हाला आमच्या डॉक्टरची फिस आणि इतर खर्चासाठी प्रत्येकी २५ हजार असे एकूण ५० हजार द्यावे लागतील असे सांगितले.
तारीख पे तारीख पण खात्यात रुपया नाही
फिर्यादी वृद्धेला २५ मे पर्यंत खात्यात १० लाख रुपये जमा होतील अशी खात्री भामट्याने दिली होती. त्याच्या या आश्वासक बोलण्यावर विश्वास बसल्याने वृद्धेने १७ मे रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान अगोदर १०० आणि पुन्हा ४९ हजार ९०० असे एकूण ५० हजार रुपये पाठविले. पैसे खात्यात मिळताच भामट्याने वृद्धेला दिलेले दोन्ही मोबाईल बंद करून टाकले.
इकडे फिर्यादी खात्यात १० लाख रुपये येण्याची बसल्या. मात्र, खात्यात एकही रुपया आला नाही. अखेर २५ तारीखही उलटून गेली, तरीही खात्यात पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच वृद्धेने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरुन भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक छोटूराम ठुबे करत आहेत.