Crime News : युवा किराणा व्यापाऱ्यावर गावठी पिस्तूलने झाडली गोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Young businessman injured firing One in custody jalna

Crime News : युवा किराणा व्यापाऱ्यावर गावठी पिस्तूलने झाडली गोळी

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : गोळीबारात व्यापारी युवक जखमी, रात्री आठ वाजता झाला थरार,रात्री उशीरा एकजण ताब्यात कुंभार पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलनातील गाळा क्रमांक दहा मधील आनंद किराणा दुकानाचे मालक आदेश पांडुरंग चांडक (वय 27) या युवक व्यापाऱ्यावर गुरुवारी (ता.27) रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात युवकाने गावठी पिस्तूल मधून गोळी झाडली यात गोळी चुकवत असताना डावा हात पुढे केल्याने हाताला गोळी लागून आदेश चांडक जखमी झाले त्यांना जालनाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असुन याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एकजणाला ताब्यात घेतले आहे.

श्री चांडक यांचे किराणा दुकान आहे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर सामान घेण्याच्या बहाण्याने एक युवक आला तर त्याचा दुसरा साथीदार रस्त्यावर उभा राहिला. चांडक यांना त्याने पैशाची मागणी केली, चांडक यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने लगेच त्याच्या जवळच्या गावठी पिस्तूलने चांडक यांच्यावर गोळी झाडली मात्र चांडक यांनी गोळी चुकवत डावा हात पुढे केल्याने त्यांच्या हातावर गोळी लागून गंभीर दुखापत झाली,रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली बसले, दुकानातही रक्त पडले.दरम्यान गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे व्यापारी,ग्रामस्थ जमा झाले तोपर्यंत गोळी झाडणार्‍या सहित अन्य एक जण दुचाकीवरून फरार झाले. जखमी युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर जालन्याला हलवण्यात आले असून त्याची प्रकृती बरी आहे.

दरम्यान पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फौजफाट्यासह परिसर पिंजून काढला.दरम्यान तासाभरातच विरेगव्हाण तांड्याजवळ एका संशयिताला ताब्यात घेतले असून काही वस्तुही मिळाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास सुरू होता. दरम्यान या घटनेने व्यापारात भीती व्यक्त होत असून रात्री उशिरापर्यंत दुकानापुढे मोठी गर्दी झाली होती.रात्री जालन्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.