‘आपला शेवटचा दिवस’ स्टेटस ठेवणाऱ्याला ५६ मिनिटांत शोधले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update suicided case whatsapp status of youth Last Day of my life police action found in 56 minutes beed

‘आपला शेवटचा दिवस’ स्टेटस ठेवणाऱ्याला ५६ मिनिटांत शोधले

बीड : एखादी घटना किंवा गुन्हा घडत असताना कळविले तरी पोलिस वेळेत येत नाहीत. अगदी सिनेमापासून वास्तवातही असे प्रकार नित्याचेच. परंतु, बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक आत्महत्या टळली आहे. ‘आपला शेवटचा दिवस’ असे स्टेटस ठेवणाऱ्याचा पोलिसांनी अवघ्या ५६ मिनिटांत शोध घेतला. एका शासकीय कर्मचाऱ्याने आर्थिक ओढाताणीतून हा टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हे स्टेटस निदर्शनास आल्याने अनर्थ टळला.

शासकीय कर्मचाऱ्याने बुधवारी (ता.२४) सायंकाळी ६.२८ वाजेच्या सुमारास आपल्या व्हॉट्सॲपला इंग्रजीमध्ये ‘आज माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे’ असे स्टेटस ठेवले. सदर स्टेटस पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील गुंड यांनी ६.३९ वाजता पाहिले. ती व्यक्ती आर्थिक विवंचनेत असून ती कोणतेही टोकाचं पाऊल उचलू शकते हे स्वप्नील गुंड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या व्यक्तीला फोन लावला. मात्र, त्याचा तो क्रमांक बंद होता.

दुसऱ्या क्रमांकावरही फोन लागत होता परंतु प्रतिसाद दिला जात नव्हता. श्री. गुंड यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सदरील व्यक्तीचा फोटो पाठवून शोध घेण्यास सांगितले. तसेच, डायल ११२ ला शोध घेण्यासाठी माहिती दिली. सायबर सेलच्या फौजदार क्रांती ढाकणे व पोलिस जमादार ए.व्ही. सुरवसे यांनी सदरील व्यक्तीचे लोकेशन मिळवले असता ते कपिलधार ते मांजरसुंभादरम्यान दाखवत होते.

लोकेशनच्या आधारे स्वप्नील गुंड व पोलिस जमादार रोहित शिंदे यांनी दुचाकीवरून धाव घेत प्रथम बिंदुसरा प्रकल्प परिसरात शोध घेतला. पण तिथेही सदर व्यक्ती मिळून आली नाही. त्यानंतर मांजरसुंभा महामार्ग पोलिसांना सदरील व्यक्तीचे फोटो पाठवून मांजरसुभा ते बीडकडे येणाऱ्या रस्त्यावर शोध घेण्यासाठी सांगितले. त्याच्याशी संपर्कादरम्यान ‘मी चाललो’ एवढेच उत्तर देत त्याने फोन कट केला. दरम्यान सदरील व्यक्ती महामार्ग पोलिसांना मांजरसुंभा घाटाजवळ निर्मनुष्य ठिकाणी दिसून आली. त्यास त्यांनी ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. समजूत काढून घरी सुखरूप आणून सोडले. बीड पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे अवघ्या ५६ मिनिटांत व्यक्तीचा शोध घेत त्यास आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याने मोठा अनर्थ टळला.

आध्यात्मिक विचारच जीवन संजीवनी ठरतील

नवीन पिढीची जीवनशैली पाहता त्यांना अध्यात्माची मोठी गरज आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्याने आपण स्वधर्म व अध्यात्माकडे दुर्लक्ष करत आहोत म्हणूनच मानव आता लवकर पराभूत होत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच वैफल्य, नैराश्‍य, तणाव यातून हताश होऊन आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नीतिमान, चारित्र्यसंपन्न व आदर्श जीवन जगायचे असेल तर आध्यात्मिक विचारच जीवन संजीवनी ठरतील असे बीड येथील ज्योतिष विशारद व धर्मशास्त्राचे अभ्यासक सूर्यकांत मुळे यांनी सांगितले.

भविष्याच्या चिंतेमुळे माणूस टोकाचा विचार करतो

नुकसान, अपयश, भविष्याची चिंता यामुळे माणूस असा टोकाचा विचार करतो. अशा व्यक्तीला सुरुवातीला नातेवाईक - मित्रांनी आर्थिक संकटातून बाहेर काढणे गरजेचे असते. त्यानंतर समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार, योगा या बाबींचा फायदा होऊ शकतो. मात्र, संकटातून आलेले नैराश्‍य हेच या या मनःस्थितीचे कारण असल्याने अगोदर संकट दूर करायला हवे असे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोमीन मुजाहेद यांनी सांगितले.

Web Title: Crime Update Suicided Case Whatsapp Status Of Youth Last Day Of My Life Police Action Found In 56 Minutes Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..