
धारदार शस्त्राचा धाक दाखवून अडीच तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
आष्टी : तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या परिचारिका जयश्री शेळके यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून अंगावरील अडीच तोळ्याच्या दागिन्यासह घरातील नगदी आठ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी (ता.३०) मध्यरात्री २.३० सुमारास घडली. या प्रकाराने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्री गस्त घालण्याची मागणी होत आहे.
आष्टी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांत वाढ झालेली आहे. त्यामुळे कडा येथील सर्व सामान्य नागरिक भयभीत झाले आहे. कडा येथे शनिवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिका जयश्री शरद गायकवाड (शेळके) यांच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी धारदार शस्त्रासह घरात प्रवेश करत दाम्पत्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील दागिणे, किंमती वस्तूंसह पैशाची मागणी केली. तसेच या दाम्पत्यांच्या एक वर्षाच्या बाळाला रडू देऊ नका. आवाज बंद करा. नसता बाळाला मारण्याची व पळवून नेण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावरच्या दागिन्यासह घरातील इतर अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यासह नगदी ८ हजार रु चोरून पोबारा केला.
तसेच घरातील कोणी ही व्यक्ती घराबाहेर पडू नये यासाठी चोरट्यांनी शेजारी राहत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. यातील एका चोरट्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये याकरिता अंधाराच्या मार्गाने जाऊन लाकडी दांड्याने सीसीटीवी कॅमे-याची दिशा बदलल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार दवाखान्याच्या सीसीटीवीच्या फुटेजमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ओळख पटू नये म्हणून चोरांनी चेहरा झाकण्यासाठी मास्क लावल्याचे दाम्पत्यांकडून सांगण्यात आले. कडा परिसरात एका आठवड्यात चोरीची ही तिसरी घटना घडली आहे. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. घटनरची माहिती मिळताच आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, प्रभारी पोलिस निरिक्षक विजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्यासह बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.