लॉकडाऊनचे आदेश धुडकावणाऱ्या ५५ जणांविरुद्ध गुन्हे 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 25 मार्च 2020

जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५५ जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

नांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५५ जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही संचारबंदीचे आदेश धुडकावणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. 

देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता. २२) मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले होते. संचारबंदीचे आदेश लागू असल्याने महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना संचारबंदी आदेश तब्बल ५५ जणांनी धुडकावले. संचारबंदीचा भंग केला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचाकोरोना : दुकानासमोर ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर

५५ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे 

यात ता. २२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू मोडणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  ता. २३ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश धुडकावणाऱ्या १३ जणांविरूद्ध,  ता. २४ मार्च रोजी १८ जणांविरुद्ध तर ता. २५ मार्च रोजी सात जणांविरुद्ध अशा एकूण ५५ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही संचारबंदीचे आदेश धुडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या लॉकडाउनचा भंग करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे.
 
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास आणि रोख रकमेचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  त्यामुळे सुजाण नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनला पूर्णपणे सहकार्य करावे. पोलिस, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against 55 men who defy lockdown orders nanded crime news