कोरोना : दुकानासमोर ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 25 मार्च 2020

शहरातील काही किराणा दुकानावर किंवा औषधी दुकानावर तसेच भाजीपाला विक्रेत्याजवळ गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांचे अंतर ठेवण्यासाठी जागा आखीव केली आहे.

नांदेड :  जिल्‍ह्यात कोरोनाची सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भागात आता दुकानासमोर एक मीटरचे अंतर सोडून ग्राहकांना उभे करण्यात येत आहे. तरोडा नाका भागात एका दुकानदाराने आपल्या दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहावे यासाठी जागा आखीव केली आहे. 

जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा लागू करुन खंड दोन, तीन व चार मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. 

हेही वाचाकोरोनाचे सावट : सहकाऱ्याची गुढी उभारा- एसपी विजयकुमार

पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. परंतू सद्यपरिस्थीती विचारात घेता हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही सदरील आदेश लागु करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी फौजदारी प्रक्रीया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्‍वये जमावबंदीचे आदेश ता. ३१ मार्चच्या रात्रीपर्यत जिल्ह्यात लागू केले आहेत.

भाजीपाला व किराणामाल विक्रीसाठी आदेश लागु 

सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या संपुर्ण भागामध्ये (ता. २३) मार्च रोजीच्या आदेशात नमुद केलेल्या बाबी कायम ठेवुन भाजीपाला व किराणामाल विक्रीसाठी खालीलप्रमाणे आदेश लागु करण्यात येत आहे.

येथे क्लिक कराघरीच थांबा... कोरोनाला पळवा- खा. चिखलीकर

दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता

भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या ठिकाणी खालीलप्रमाणे नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकणार आहेत. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एकमिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणामाल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. उपरोक्त ठिकाण, कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक, चालक, व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन येथे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: One meter away from the customer in front of the shop nanded news