esakal | शस्त्रांचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी अवघ्या पाच तासात जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

वसमत

वसमत महामार्गावरील औंढा, नांदेड, मालेगाव व निळा रोडवर वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असून त्या उघड होण्याची शक्यता आहे

शस्त्रांचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी अवघ्या पाच तासात जेरबंद

sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत (हिंगोली): वसमत-नांदेड, औंढा-नांदेड महामार्गावर धारधार शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीसह इतर वाहने अडवून मारहाण करीत लुटमार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. बुधवारी (ता.८) जिंतूर टी पाईंटवर मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने पाठलाग करुन पकडले. चोरट्यांकडून धारदार शस्त्रे, चोरीचा माल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसमत महामार्गावरील औंढा, नांदेड, मालेगाव व निळा रोडवर वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असून त्या उघड होण्याची शक्यता आहे.

वसमत-नांदेड रोडवरील जिंतूर टी पाईंटवर बुधवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात बोराळा येथील शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी आरोपीविरुद्ध वाटमारी, गंभीर मारहाण करून लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस कर्मचारी साहेबराव चव्हाण, विश्वनाथ खंदारे, निलेश अवचार, नामदेव बेंगाळ. सचिन बिजले, भुजंग भांगे यांच्या पथकाने बुधवारी रात्री जिंतूर टी पाईंटवर नाकेबंदी केली.

हेही वाचा: NEET Exam: नांदेडमध्ये रविवारी ३५ केंद्रावर होणार परीक्षा

रात्री ११ च्या सुमारास विना नंबरची पल्सर दुचाकीवर तीन इसम नांदेड येथून औंढाकडे जात होते. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता ते कन्हेरगावच्या दिशेने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन एकास दुचाकीसह पकडले. यावेळी दोघे ऊसात लपले. पोलिसांनी रात्री शोध घेऊन त्या दोन चोरट्यांना पकडले. पकडलेल्या आरोपींमध्ये चक्रधर खराटे, संभाजी उर्फ बाळू कल्यानकर व शिवाजी खराटे राहणार सर्व कौठा येथील आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्र, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा माल असा एकूण ८७७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसमत ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासात गुन्हेगारांना जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

अनेक वाटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता-

सदरील पकडण्यात आलेल्या वाटमारी करणाऱ्या चोरट्यांकडून अनेक वाटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीसह नांदेड व परभणी हद्दीतील महामार्गावर वाटमारी करुन शस्त्राने गंभीर मारहाण व सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

loading image
go to top