esakal | परभणीतल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जगभरात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मोठ्याप्रमाणात शेतमालाची नासाडी झाली. तरी नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मान्सुनपूर्व झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतू, जिल्ह्यातील काही भागात पावसाने ओढ दिल्याने उगवलेली कोवळी रोपे पावसाअभावी पिवळी पडत आहेत. आणखी काही दिवसात मोठा पाउस न झाल्यास कोरोना नंतर शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. 

परभणीतल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या संकटात सापडल्या असून पेरणी केलेल्या पिकांवर किंडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उगवलेली कोवळी पिके नष्ट होऊ लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (ता. २५) रात्री ६.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सावंगी, म्हाळसा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली. काही दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस येत होता. पेरण्या वेगात सुरू असताना पाऊस गायब झाला आहे. अधूनमधून हलक्या सरींची हजेरी लागते. परंतु, त्या पावसाने नुकत्याच उगवणाऱ्या पिकांना लाभ होत नाही. तसेच उर्वरित पेरणी थांबली आहे. पाऊस नसल्याने कोवळ्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीसह सोयाबीनची कोवळी पाने खाणारी पैसा नावाची अळी सर्वत्र दिसत असून कपाशीचे पीक फस्त करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सावंगी म्हाळसा (ता. जिंतूर) मंडळात ८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा :​ राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोक्याची घंटा


मंडळनिहाय झालेला पाऊस(मिलिमीटरमध्ये)
परभणी शहर ०२, परभणी ग्रामीण ०३, दैठणा ०१, झरी ०४, पेडगाव ०३, पिंगळी ०४, जांब ०१, बनवस १७, पूर्णा०८, लिमला ०३, कातनेश्वर १०, राणीसावरगाव ०२, महातपुरी ०४, सोनपेठ १०, सेलू ०२, देऊळगाव ०४, वालूर ०३, चिकलठाणा ०२, पाथरी ०३, बाभळगाव ०३, हादगाव १९, जिंतूर १९, बोरी ०२, चारठाणा ०२, आडगाव ०३, बामणी ३८, माननवत ०९, कोल्हा १३.
एकूण ६.७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.


हेही वाचा : कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच नांदेडला अशोक चव्हाण यांचे आगमन 


बियाणे निघाले बोगस
यंदा सोयाबीन बियाणे बोगस निघत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात आता दुसरे बियाणे पेरणीसाठी पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीन पेरणीसाठी जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत योग्य वेळ असते. परंतु, आता जुलै महिनादेखील तोंडावर आला आहे. तरीही अजूनही मोठा पाऊस झाला नसल्याने झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी मूग आणि उडदाचे क्षेत्र घटत चालले आहे. यंदादेखील शेतकऱ्यांनी या पिकांना फारशी पसंती दिली नसल्याचे चित्र आहे. आता तर पेरणी केलेले मूग आणि उडीद पीक धोक्यात आले आहे.