esakal | कोरोनाचे पोतरा येथील यात्रेवर संकट
sakal

बोलून बातमी शोधा

korona

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने तसेच जमावबंदी आदेश असल्याने ही यात्रा रद्द करण्याचे आदेश तहसीलदार कैलासंचद्र वाघमारे यांनी दिले आहेत. येथे पवित्रेश्वरांचे मंदिरदेखील बंद आहे. येथील पुजारी केवळ सकाळ, सायंकाळी पवित्रेश्वराची पूजा, आरती करीत आहेत. त्‍यानंतर मंदिर बंद ठेवण्यात येत आहे.

कोरोनाचे पोतरा येथील यात्रेवर संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोतरा/ आखाडा बाळापूर( जि. हिंगाेली) : कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा येथील पवित्रेश्वराची शनिवारी (ता.चार) कामदा एकादशीपासून सुरू होणारी आमल्या बारशीची यात्रा या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्याच्या सूचना तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिल्या आहेत. यात्रेनिमित्त यावर्षी जय्यत तयारी करण्यात आली होती. आता मात्र भाविकांना यात्रेपासून वंचित रहावे लागणार आहे.

पोतरा येथील पवित्रेश्वर महादेवाची आमल्या बारशीची यात्रा कामदा एकादशी ते हनुमान जयंतीपर्यंत असते. यात्रेनिमित्त गुढीपाडव्यापासून बारा दिवस महादेवाच्या काठीची पूजा रामराव बाबूराव मुलगीर यांच्या घरी केली जाते. बाराव्या दिवशी काठीची मिरवणूक काढून जागरणाचा कार्यक्रम होते. यात्रेत हिंगोली, नांदेड, वाशीम, परभणी आदी ठिकाणांवरून कावडी घेऊन भाविक सहभागी होतात. तसेच अनेक गावांतील शेतकरी बैलजोड्या घेऊन पवित्रेश्वर महादेवाला प्रदक्षिणा घालतात.

हेही वाचाहिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

यात्रा रद्द करण्याचे आदेश 

 येथे आलेल्या बैलांना पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो. तसेच महादेव मंदिरासमोर असलेल्या माळरानावरील दीपमाळ यात्रेनिमित्त पेटविली जाते. चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. बाहेरगावी असलेले गावकरी तसेच माहेरवासीनी हमखास यात्रेला गावी येतात. परंतु, या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने तसेच जमावबंदी आदेश असल्याने ही यात्रा रद्द करण्याचे आदेश तहसीलदार कैलासंचद्र वाघमारे यांनी दिले आहेत. येथे पवित्रेश्वरांचे मंदिरदेखील बंद आहे. येथील पुजारी केवळ सकाळ, सायंकाळी पवित्रेश्वराची पूजा, आरती करीत आहेत. त्‍यानंतर मंदिर बंद ठेवण्यात येत आहे.

कृष्णापूर येथील कार्यक्रम रद्द

आखाडा बाळापूर : कृष्णापूर येथे महादेव मंदिर आहे. या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर बारा दिवसांनी बार्शीची यात्रा भरते. त्‍यानिमित्त दर्शनासाठी भाविक येतात. याशिवाय परिसरातील शेतकरीही बैलजोड्या घेऊन दाखल होतात. या वर्षी यात्रेवर कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. कोरणा विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. बार्शीची यात्रा रद्द करावी, अशा सूचना तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिल्या आहेत.

बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. त्‍याचा परिणाम बाजार समितीत येणाऱ्या शेतमालावर झाला आहे. अत्यावश्यक सेवेत येणारी बाजार समिती सुरू असताना शेतकरी मात्र, याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत आलेल्या मालाची खरेदी होत असल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी (ता. १४) पर्यंत संचारबंदी आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू आहे.

येथे क्लिक कराकळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्‍थापना

सेनगावात शेतमाल खरेदी

 येथे शेतमाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदीदेखील केली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणाच्या बाजार समितीत शेतकरी शेतमाल घेऊन येत नसल्याने व्यवहार होईनासे झाले आहेत. दरम्‍यान, बुधवारी (ता. एक) सेनगाव येथील संत नामदेव बाजार समितीत १५ वाहनांतून ७५ क्‍विंटल तूर, सात वाहनांतून ९३ क्‍विंटल हरभरा, दोन वाहनांतून ७.४६ क्‍विंटल सोयाबीन असा १७० क्‍विंटल माल खरेदी करण्यात आला.

गावांतील सीमा बंद केल्याचा परिणाम

कळमनुरी येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. दोन) ११ वाहनांतून २४५ क्विंटल शेतमाल आला होता. या दिवशी सेनगाव येथे १७ वाहनांतून ३४१ क्‍विंटल शेतमाल विक्रीस आला होता. त्‍याची खेरदी करण्यात आली आहे. तर हिंगोली, वसमत, आखाडा बाळापूर व जवळा बाजार येथील बाजार समितीत शेतमालाची आवक नसल्याचे श्री. मैत्रेवार यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांतील सीमा ग्रामस्‍थांनी बंद केल्याने तसेच बहुतांश शेतकरी घराबाहेर पडत नसल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.