esakal | हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

korona

हिंगोली जिल्हा रुग्णालयात पाच जण कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यातील एकाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तीन जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला जिल्ह्यातील पहिलाच रुग्ण असून आता नागरिकांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या एका कोरोना संशयिताचा अहवाल गुरुवारी (ता. दोन) जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झाला असून हा संशयित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात पाच संशयित दाखल असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. दरम्यान, यातील तिघांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णास (वय ४९) मंगळवारी (ता.३१) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर रुग्ण कोविड केस (कोरोनाग्रस्‍त रुग्ण) यांच्या संपर्कातील होता. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात या रुग्णाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

हेही वाचादक्षता घ्या, सूचनांचे पालन करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

चार जण कोरोना संशयित

गुरुवारी ४९ वर्षीय संशयित रुग्णाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेला जिल्ह्यातील पहिलाच रुग्ण आहे. दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालयात आखणी चार जण कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यातील तीन जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आयसोलेशन वार्डात भरती 

तिघांचेही अहवाल प्रलंबित आहेत. यातील (वय ११) रुग्णास बुधवारी (ता. एक) आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळून आली आहेत. दुसरा रुग्ण हा कझाकिस्‍तानवरून आलेला आहे. तिसरा रुग्ण कझाकिस्‍तानवरून आलेल्या आणि होम क्‍वॉरंटाइन ठेवलेल्या व्यक्‍तीचा भाऊ आहे.

येथे क्लिक करादिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश

दोन जणांना होम क्‍वॉरंटाइन

 दोघांनाही ताप, सर्दी ही लक्षणे आहेत. चौथा रुग्ण (वय ३५) असून त्‍याला गुरुवारी (ता. दोन) पहाटे पाच वाजता जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील रुग्ण कोविड केस (कोरोनाग्रस्‍त रुग्ण) यांच्या संपर्कातील आहे. जिल्‍हा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या दोन जणांना होम क्‍वॉरंटाइन (घरातच अलगीकरण) ठेवण्यात आले आहे. 

जिल्ह्यात पहिला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण

दोन्ही व्यक्‍ती मालदिवमधून आलेल्या आहेत. जिल्‍हा रुग्णालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रॅपिड रिस्‍पॉन्स टीम व पोलिस प्रशासनामार्फत दरदिवशी पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. अंत्यत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अत्‍यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. श्रीवास यांनी केले आहे.