esakal | Crop Insurance: मराठवाड्यात अकरा लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

crop insurance

Crop Insurance: मराठवाड्यात अकरा लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

sakal_logo
By
विकास व्होरकटे

औरंगाबाद: मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांनी ११ लाख ३६ हजार ७८९ हेक्टरवरील खरीप पिकांचे क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यासाठी एकूण २३ लाख २५ हजार २३१ अर्ज आले आहेत. यात कर्जदार शेतकरी अर्जाची संख्या ८ हजार ८७३ तर बिगर कर्जदार शेतकरी अर्जांची संख्या २३ लाख १६ हजार ३५८ आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत यंदा कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी खरिपातील पिकांना संरक्षित विमा दिला जात आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीकडे किंवा कृषी कार्यालयाकडे तक्रार करता येते. यानंतर विमा कंपनी किंवा कृषी विभागाच्या पाहणीत दरडोई उत्पन्न कमी झाल्याचे आढळून आल्यास सदरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते.

जिल्हानिहाय माहिती

जिल्हानिहाय माहिती

यंदाचा खरीप विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. यास दोन दिवसच बाकी आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी वेळीच पीकविमा भरून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. १३ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागात ८ लाख ५२ हजार ८६८ अर्जाद्वारे ३ लाख २० हजार ३ हेक्टर तर लातूर विभागातील लाखो शेतकऱ्यांनी १४ लाख ७२ हजार ३६३ अर्जाद्वारे आठ लाख १६ हजार ७८६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनसह कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असतानाही अनेक शेतकरी अद्याप गतवर्षीच्या खरीप विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा विमा भरण्यास हवा त्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

हेही वाचा: Amazon च्या 'प्रोजेक्ट कुइपर'साठी फेसबुकमधील तज्ज्ञांची टीम

सीएससी केंद्रासह बॅंकेत अनेकदा इंटरनेटचा व्यत्यय येत आहे. तसेच कोरोनामुळे शासन नियमांचे पालन करून पीकविमा भरला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीकविमा भरलेला नाही. त्यामुळे पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
-दत्ता शिंदे, शेतकरी, पीरकल्याण (ता. जालना)

loading image