गल्लीबोळांतील रस्त्यावर नागरिकांचे जथ्थे

धनंजय देशपांडे
Sunday, 29 March 2020

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी केंद्र शासनाने तीन आठवड्यांची संचारबंदी लागू केली असली तरी पाथरी शहरात मात्र, नागरिकांनी याला पूर्णतः हरताळ फसला आहे. 

पाथरी (जि. परभणी) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी केंद्र शासनाने तीन आठवड्यांची संचारबंदी लागू केली असली तरी पाथरी शहरात मात्र, नागरिकांनी संचारबंदीला पूर्णतः हरताळ फसला आहे. शहरातील प्रमुख्य रस्त्यावरून दिवसभर दुचाकी वाहने फिरतात दिसत आहेत. त्याच बरोबर गल्लीबोळांत नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे बसत आहेत. या साऱ्या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

देशभरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग असल्याने शासनाने आधी जमावबंदी व त्यानंतर संचारबंदी लागू केली.  असे असले तरी, पाथरी शहरातील नागरिकांत अद्याप जनजागृती झाली नसल्याचे मागील काही दिवसांत दिसून येत आहे. संचारबंदीच्या काळात पूर्णतः लॉकडाऊन असताना शहरात मात्र, संचारबंदीला अक्षरशः हरताळ पाळला गेला आहे. सकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा रस्त्यावर झुंबड उठत आहे. दुपारी ११ नंतर ही रस्त्यावर फळगाडे आणि भाजीपाल्यांची दुकाने सर्रासपणे सुरू आहेत.  

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

दूध उत्पादक रस्त्यावरच मारताहेत गप्पा
सेलू कॉर्नर, सेंट्रल नाका भागात तर दुचाकीची मोठी वर्दळ दिवसभर असते. घरोघरी दूध पोचविणारे दूध उत्पादकही मुख्य रस्त्यावर वाहने लावून गप्पा मारत आहेत. तर शहरातील लेंडीपूल, आठवडे बाजार, चौक बाजार, जोडकुंवा, पठाण मोहल्ला,  जेतापूर मोहल्ला, शिंदे गल्ली, माळीवाडा यासह इतर भागात नागरिक रस्त्यावर जथ्थे करून बसत आहेत. पोलिसांचे वाहन आले की पळून जातात,  परत एकत्र येऊन गप्पा मारतात. त्यामुळे पाथरीत सक्तीची संचारबंदी दिसतच नाही. अशी परिस्थिती नित्याचीच झाली असल्याने पाथरीकरांनी संचारबंदीला अक्षरशः हरताळ फासला असल्याचे चित्र आहे.

सोडियम हायफो क्लोराईडची फवारणी 
कोरोना व्हायर्सने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी झाली असल्याने देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकार या विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने  नागरिक घरात बसून असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरसेवक सरसावले असून संचारबंदीतही आपापल्या प्रभागात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणीसह स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तरी नागरिकांकडून आदेशाची पायमल्ली होते. प्रभागात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणी करून घेण्यासाठी नगरसेवक स्वतः जातीने लक्ष देत आहेत.झाडझूड व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A crowd of citizens on the street