‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

file photo
file photo

सोनपेठ (जि.परभणी)  :  ‘दैनिक सकाळ’ने  २६ मार्चला ई-सकाळ व ‘दैनिक सकाळ’ मध्ये ‘कोरोनामुळे आई-वडिलांपासून चिमुकला दुरावला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. बातमीची दखल घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन मध्ये आईला मुलांकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे आठवडाभरा नंतर शनिवारी (ता.२८) चिमुकला आपल्या आईच्या कुशीत विसावला. 

सोनपेठ तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी समीर वाळके यांच्या पत्नी नम्रता वाळके या सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आहेत. मागील आठवड्यात वाळके दांपत्य हे आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला हिंगोली येथे त्याच्या आजीकडे सोडून आपल्या शासकीय कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यानंतर जिल्हा बंदी व लॉकडाऊन लागू झाल्याने हे पती-पत्नी आपल्या कामाच्या ठिकाणीच अडकून पडले. तर त्यांचा मुलगा आपल्या आजीकडेच अडकला होता. त्यानंतर तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन झाला. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश निघाले. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने आहे तेथेच थांबण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या वाळके दांपत्याने आपल्या मुलाच्या भेटीसाठी विविध प्रयत्न केले. परंतु सर्वत्र बंद असल्याने त्यांची आणि मुलाची भेट होण्याची सगळ्याच शक्यता मावळल्या होत्या. त्यामुळे वाळके दाम्पत्य हे अत्यंत दुःखी होऊन बसले होते. 


सोनपेठ तहसीलदारांकडून कारवाई
यासंदर्भातील बातमी २६ मार्चला ई-सकाळ व ‘दैनिक सकाळ’ मध्ये ‘कोरोनामुळे आई-वडिलांपासून चिमुकला दुरावला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी सोनपेठ येथील तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी वाचून सदरील आई मुलाची भेट घडवून आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली. 

‘सकाळ’ चे मानले आभार
या बातमीची दखल मुख्यमंत्री कार्यालय व सातारा पोलिस प्रशासन यांनीही घेतली. डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या विशेष प्रयत्नामुळे नम्रता वाळके यांना आपल्या मुलाला भेटण्यासाठी येण्याची तब्बल आठ दिवसानंतर परवानगी मिळाली. आठ दिवसानंतर चिमुकला अद्वैत हा आपल्या आईच्या कुशीत विसावला आहे. वाळके दाम्पत्य हे ता. २८ मार्चला रोजी हिंगोली येथे पोहोचताच तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य तपासणी करूनच घरी गेले. या वाळके दांपत्याने अत्यंत भावनिक होत ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले. 

हेही वाचा - गरजूंसाठी दानशुरांनी मदत करावी : जिल्हाधिकारी

आईला पाहताच चिमुकल्याने मारली मिठी 
तब्बल आठ दिवस दुरावलेल्या चिमुकल्या अद्वैतने आपल्या आईला पाहताच घट्ट मिठी मारून हंबरडा फोडला. जन्मल्यापासून पहिल्यांदाच एवढे दिवस आई-वडीलांपासून लांब राहिलेला चिमुकला अद्वैत परत आई वडिलांजवळ कुशीत विसावल्यामुळे हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येक जणांचे डोळे पाणावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com