आत्याच्या वर्षश्राद्धसाठी आलेल्या महिलेचा दगडाने ठेचून खून, बीड जिल्ह्यातील अमानवी घटना

रामदास साबळे
Wednesday, 25 November 2020

केज तालुक्यातील हादगाव डोका येथे आत्याच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी आलेल्या बेचाळीस वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी (ता.२५) दुपारी उघडकीस आली.

केज (जि.बीड) :  केज तालुक्यातील हादगाव डोका येथे आत्याच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी आलेल्या बेचाळीस वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी (ता.२५) दुपारी उघडकीस आली. या महिलेच्या खूनाच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षकांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
तालुक्यातील हादगाव डोका येथे आपली आत्या गंधारबाई इनकर यांच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मिरा बाबुराव रंधवे या महिलेला येथील शिवारातील शेतात दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करून जीवे मारल्याची घटना बुधवारी दुपारी निदर्शनास आली.

मृत महिलेने मंगळवारी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. या घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत व पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या खूनाच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा खून कोणी व का केला? याचा पुढील तपास केज ठाण्याचे पोलीस कर्मचारी करित आहेत. या प्रकरणी अद्यापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cruel Incident Occured In Beed District, Woman Killed With Stone