ट्रॅक्टर पलटी, चालकासह शेतकऱ्याचा दबून मृत्यू; जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दिलीप दखने/ बाबासाहेब गोंटे
Wednesday, 25 November 2020

शेतात रोटा व्‍हेटर मारण्यासाठी जात असलेल्‍या ट्रॅक्‍टरच्‍या चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रॅक्‍टर पल‍टी होऊन खड्ड्यात पडल्‍याने चालकासह शेतकऱ्याचा दबून जागीच मृत्‍यू झाला.

वडीगोद्री (जि.जालना) : शेतात रोटा व्‍हेटर मारण्यासाठी जात असलेल्‍या ट्रॅक्‍टरच्‍या चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रॅक्‍टर पल‍टी होऊन खड्ड्यात पडल्‍याने चालकासह शेतकऱ्याचा दबून जागीच मृत्‍यू झाला. ही घटना अंबड तालुक्‍यातील टाका येथे मंगळवारी (ता.२४) दुपारी एक वाजेच्‍या सुमारास घडली. रब्बीच्‍या पेरणीकरिता शेतात रोटा व्‍हेटर घेऊन निघालेल्‍या शेतकरी रावसाहेब किसन बढे (वय ६०) व चालक निशान बाबु शेख (वय २६ ) जात होते. दरम्‍यान, चालकाचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटल्‍याने ट्रॅक्‍टर पल‍टी होऊन खड्ड्यात जाऊन पडले.

दोघेही जण ट्रॅक्‍टरखाली दबल्‍या गेले. या मार्गावर बराच वेळ कोणीही न आल्‍याने दोघांचाही अंत झाला. घटनेची माहिती कळताच ग्रामस्‍थांनी घटनास्‍थळी धाव घेतली. ग्रामस्‍थांच्‍या मदतीने दोघांना बाहेर काढून उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्‍टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. विशेष म्हणजे रोटा व्हेटर हाण्यासाठी गावातील ट्रॅक्टर होते. या ट्रॅक्टरवर आजपर्यंत कधीही चालक ठेवला नव्हता. मालक स्वतः ट्रॅक्टर चालुन काम करत. परंतु पहिल्यांदाच चालक ठेवला. अन् काळाने घाला घालून दोघांचे प्राण गेले. रावसाहेब बढे हे प्रगतशील शेतकरी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे.

गव्हाची पेरणी तशीच राहिली
सध्या रब्बी पेरणीची धामधूम सुरू आहे. गव्हू, हरभरा पेरणी वेळेत उरकण्यासाठी शेतकरी बैलजोडी ऐवजी आता वेळेत पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरने पेरणी करत आहे. मात्र  शेतकरी रावसाहेब बढे यांची गव्हाची पेरणी तशीच राहून त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांना दोन मुले आहे. तर ट्रॅक्टर चालक निशाण शेख हा अविवाहित होता. त्याला एक भाऊ आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver And Farmers Died In Tractor Accident Vadigodri Jalna News