Video : ‘या’ जिल्ह्यात सायबर क्राईम विभाग होणार गतिमान  

Nanded News
Nanded News

नांदेड : नांदेडची ओळख जगभरात असली तरी त्यासोबतच हे संवेदनशील शहरही आहे. त्यामुळे सातत्याने पोलिस विभागाला ‘अलर्ट’ राहावे लागते. नांदेडमध्ये पोलिस चौकी कार्यान्वित करण्यासोबत इतरही महत्त्वाच्या कारवाया केल्यामुळे गुन्हेगारी कमी करण्यात पोलिस विभागाला यश आले असून अजूनही काही गुन्हेगार हिटलिस्टवर आहेत.

नांदेडमध्ये काम करताना यापूर्वी सोलापूर, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांत केलेल्या कामांचा अनुभवही मदतीला आला, असे म्हणत, भविष्यात नांदेडमध्ये सायबर क्राईम विभाग गतिमान करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात गुरुवारी (ता. १९) दिली.

...तर शांतता बाधित होत नाही
कर्तव्यकठोर व शिस्तीच्या खात्यात काम करताना अनेक अडथळे येत असतात. परंतु, आपण करीत असलेले काम मन लावून केले तर त्याचे समाधान मिळते. कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही, यासाठी आम्ही नेहमी अलर्ट असतो. जिल्ह्याचा इतिहास पाहता पोलिसदप्तरी रेड स्पॉट असल्याचे समजले. मात्र, येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तिथेच सोडविल्या तर शांतता बाधित होत नाही. त्या दिशेने पोलिसांचे पाऊल असून समाजकंटक माझ्या नजरेतून कधीच सुटणार नाहीत. त्यांची जागा त्यांना दाखविल्याशिवाय मला चैन पडत नाही. काही गुन्हेगांराना त्यांच्या ठिकाणी पाठविले असून अजून काही हिटलिस्टवर आहेत. त्यांनी आता तरी सावध होऊन सांभाळून राहिले तर त्यांचे त्यात भले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
रिंदा गँगची दहशत केली कमी
नांदेड जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक म्हणून माझी सोलापूर आयुक्तालयातून बदली झाली. हे शहर माझ्यासाठी पूर्ण नवीन होते. येथे ता. २४ आॅगस्ट २०१९ रोजी आल्यानंतर लगेचच महत्त्वाचे बंदोबस्त लागले. त्यात लोकसभा निवडणूक, महत्त्वाच्या सण- उत्सवांचा समावेश होता. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असून ३६ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. शहरात सुरू असलेली रिंदा गँगची दहशत कमी केली. त्यातील एकजण (शेरा) पोलिस चकमकीत ठार झाला. त्यानंतर गुन्हेगारी जगतात पोलिसांबद्दलची दहशत पसरली. अनेकांनी जिल्हा सोडून दिला, तरी काही जण डोके वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढणार. मटका माफियांवर मोक्का लावून त्यांना कारागृहात पाठविले असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचाच अशी होते तिरंगी झेंड्याची निर्मिती
 
पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव
पोलिसांच्या क्रीडा संदर्भातही वरिष्ठ कार्यालयाशी बोलून खेळाडूंना विशेष सवलत देणार आहे. जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने निश्‍चितच या ठिकाणी पोलिस आयुक्तालय व्हावे, त्यासाठी मी प्रस्ताव पाठविलेला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. पुणे, नाशिक, नगर अशा मोठ्या शहरांत काम केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
 
सायबर क्राईम विभागावर लक्ष
तंत्रज्ञानासोबतच सायबर क्राईमही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. विशेष हे की, सायबर क्राईमला बळी पडत असलेले नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. त्यांच्यामध्ये जागरुकता नाही. काही नागरिकांनी तक्रार दिलीच तर पोलिस ठाण्यातून त्यावर लवकर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सायबर विभाग लवकरच गतिमान करण्याचे धोरण मी आखलेले आहे. सद्यःस्थितीत तंत्रज्ञान आले असले तरी त्याचा वापर कसा करावा याचे बेसिक नॉलेज नसल्यामुळे सायबर क्राईम होताना दिसत नाही. त्यामुळे सायबर क्राईम विभाग लवकरच गतिमान करण्याचा मानस आहे. त्यासाठी १२ कर्मचाऱ्यांवर या विभागाची जबाबदारी टाकण्यात आली असून, त्यापैकी नऊ जणांना प्रशिक्षणही दिलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी सायबर क्राईमविषयीच्या तक्रारी थेट पोलिस ठाण्यात न देता वरिष्ठांकडे द्याव्यात. जेणेकरून सायबर क्राईम करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल. सायबर क्राईमचा गुन्हा डिटेक्ट झाल्यास संबंधित बॅंकेला सदर व्यक्तीला पैसे द्यावेच लागतात; पण त्यासाठी पुरावे, गुन्हा दाखल होणे आवश्‍यक आहे.

हे वाचा‘हे’ गाव आहे डॉक्टरांचं - कोणतं ते वाचा सविस्तर
 
शहर वाहतूक होऊ शकते सुरळीत
शहरातील वाहतुकीची समस्या फार मोठी नाही. पोलिस विभागासोबत महापालिका, जिल्हा प्रशासन, आरटीओ व इतर विभागांनी समन्वय ठेऊन सहकार्य केले तर निश्‍चितच शहरातील वाहतुकीची समस्या सोडवून ती सुरळीत करता येऊ शकते. त्यासाठी महापालिकेने सिग्नलची व्यवस्था अत्याधुनिक पद्धतीची करण्याची गरज आहे. या पूर्वी या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. आता पुन्हा एकदा बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
 
पोलिस चौकी झाल्या कार्यान्वित
शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या पोलिस चौकी कार्यान्वित करण्यास सुरवात केली. शहरात अशा जवळपास २२ पोलिस चौकी असून, त्यापैकी १८ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित चारही लवकरच कार्यान्वित होतील. शहरात सुरू करण्यात आलेल्या पोलिस चौक्यांमुळे नागरिक, विशेष करून महिला भयमुक्त वावरत आहेत. सिडको, विजयनगर आणि श्‍यामनगर येथील आयआयबी येथील पोलिस चौकीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नागरिकांचा तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com