बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला तलावात

केशव गायकवाड
सोमवार, 26 मार्च 2018

दहावी परीक्षेचा पेपर असल्याने दीपक परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षेला गेलेला दीपक घरी आलाच नाही. २२ मार्च रोजी परीक्षा देऊन घरी आला नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. याची माहिती नातेवाईकांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यातही दिली होती

इटकळ - गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाभळगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील पळस निलेगाव तलावात आज (सोमवार) सकाळी आढळून आला. 

बाभळगाव येथील दीपक दतात्रय चव्हाण (वय १६) हा विद्यार्थी राष्ट्र सेवा दल संचलित नळदुर्ग येथील आपलं घर या वसतीगृहात राहात होता. तो तेथीलच धरित्री विद्यालयात दहावीच्या वर्गात होता. १९ मार्च रोजी दुपारी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याच दिवशी रात्री उशिरा वसतीगृहातील संबंधित अधिकारी दीपकला घेऊन बाभळगाव येथे त्याच्या घरी आले व त्याच्या आजीकडे सोडून गेले होते.

२१  व २२ मार्च रोजी दहावी परीक्षेचा पेपर असल्याने दीपक परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षेला गेलेला दीपक घरी आलाच नाही. २२ मार्च रोजी परीक्षा देऊन घरी आला नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. याची माहिती नातेवाईकांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यातही दिली होती. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी (ता. २४) तलावामध्ये पाहणी केली होती. परंतु काही आढळून आले नव्हते. सोमवारी सकाळी दीपकचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना आढळून आला. 

याची माहिती मिळताच दीपकचे कुटुंबिय व नातेवाईक तलावाजवळ आले. दीपकचा घातपात केला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केले. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घातपाताविषयीचा प्रकार आहे का, हे सांगता येईल व यात कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Web Title: dead body of missing student found in a lake