कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह : बलात्कार की खून?

वाल्मिक पवार
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मूळचा उत्तर प्रदेशातील हा आरोपी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याची मिस्तरी कामे करतो. त्यास विचारपूस केली, मात्र काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे मुलगी बेपत्ता आसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.

चापानेर (ता. कन्नड) : आठेगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा फक्त खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, चापानेर (ता.कन्नड) येथे राहणाऱ्या रवी रामलाल राव (वय २३, मूळ रा. खलीलाबाद, संत कबीर नगर, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याने मृत तरुणीस चापानेर शिवारातील (गट क्र.१०८ मधील) संतोष बोरसे यांच्या शेतात नेऊन अतिप्रसंग केल्याचा संशय आहे.

हेही वाचा - जालन्याचे चार तरुण अपघातात ठार

शुक्रवारी (ता.२९) रात्री आठ वाजले, तरी तरुणी घरी न आल्याने आई, वडील व नातेवाईकानी शोधाशोध सुरू केली. मात्र तरुणी सापडली नाही. म्हणून रवी राव याच्यावर घराच्यांना संशय आला. आरोपी हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याची मिस्तरी कामे करतो. त्यास विचारपूस केली, मात्र काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे मुलगी बेपत्ता आसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी संशयित अरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली, तरी आरोपीने कबुली दिली नाही. म्हणून रात्री साडे अकरा वाजता कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवासे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजून काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला.

कुठे? वाचा - काळीपिवळी जीप उलटली, 15 जण जखमी

रात्रीच तरुणीचे प्रेत शवविच्छेदनासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बलात्कार की खून अशा चर्चेला उधाण आले आहे. तिचा खून झाला की बलात्कारसुद्धा, हे शवविच्छेदन झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadbody of a Girl Found in Chapaner Kannad in Aurangabad District