वाढदिवसालाच काळाचा घाला

वाढदिवसालाच काळाचा घाला

देवणी - पेरू खाण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचे घरी मृतदेहच आले, त्यातल्या एकाचा तर त्याच दिवशी वाढदिवसही होता. त्यानिमित्त त्याची आई तालुक्‍याच्या ठिकाणी नवे कपडे आणि केक आणण्यासाठी गेली होती; पण हे वाढदिवसाचे नवे कपडे अखेरचे ठरतील याची कल्पनाही तिला नव्हती. 

भोपणी येथील प्रकल्पात बुडाल्याने तालुक्‍यातील भोपणी येथील धीरज दत्ता मोरे व प्रणव राम मोरे या दोन सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या भावंडांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला, या घटनेने गाव सुन्न झाले होते. 

धीरज मोरे (वय १२) याचा रविवारी वाढदिवस. वाढदिवस व शाळेला सुटी असल्याने त्याने मित्रांबरोबर गावालगतच मौजमजा करण्याचे ठरविले होते. त्यामुळे धीरज आणि प्रणव त्याच्या आणखी दोन मित्रांसोबत पेरू खाण्यासाठी तलावाकाठी गेले अन्‌ पोहण्याचा मोह आवरलाच नाही. त्यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इकडे मुलाचा वाढदिवस असल्याने धीरजची आई गावापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगीरला केक व नवीन कपडे आणण्यासाठी गेली होती. घरातील गरीब परिस्थिती असतानाही मुलासाठी त्यांनी पाचशे रुपयाचा नवा ड्रेस खरेदी केला अन्‌ केक घेऊन त्या गावी निघाल्या होत्या; मात्र वाढदिवसानिमित्त घेतलेले कपडे शेवटचेच ठरले. 

मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आईने हंबरडा फोडला. धीरज आणि प्रणव दोघेही सख्खे चुलतभाऊ अन्‌ बालपणीपासूनचे मित्रही. त्यामुळे कायमच सोबत राहत असत. धीरज अन्‌ प्रणवच्या अनेक सवयी, आवडी निवडी एकसारख्याच होत्या. त्यातीलच एका छंदाने त्यांना बेसावध क्षणी गाठले अन्‌ होत्याचे नव्हते झाले. रविवारी उशिरा देवणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सकाळी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com