पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यु 

3atharv
3atharv

सेलू ः गुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या करडगाव (ता.सेलू) येथील दोन भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.सहा) रोजी घडली. 

करडगाव (ता.सेलू) येथील रहिवासी मुंजा उत्तम वाटुरे (वय १५) व गौतम उत्तम वाटुरे (वय १२) हे दोघे सख्खे भाऊ आई व वडील सेलू येथील दवाखाण्यात गेल्यामुळे दुधना नदी पात्राशेजारी असलेल्या त्यांच्या स्वत:च्या शेतात बैलांना चारा, पाणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते. 

एकाने वाचवला जीव
गुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी ते उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही भाऊ पाण्यात वाहत असताना गौतम उत्तम वाटुरे याने गवताच्या बेटीचा आसरा घेत आपला जीव वाचवला. मात्र, मुंजा उत्तम वाटुरे हा पाण्याच्या प्रवाहात वाहुन जात अर्धा किलोमीटर अंतरावर दुधना नदीपात्रात असलेल्या विहिरीत अडकला. मात्र, तोपर्यंत तो मयत झाला होता. त्याचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी नदीपात्रातुन बाहेर काढला. मयत मुंजा उत्तम वाटुरे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा तपास पोलिस करत आहेत. 

वेअरहाऊसच्या गोदामातून एक लाख ६२ हजाराची रोकड लंपास 
परभणी ः पाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयामोरील एका वेअरहाऊसचे शटर वाकवुन चोरट्यांनी एक लाख ६२ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी (ता. सहा) पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोडाऊनचे शटर वाकवुन चोरट्यांनी आत प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली. गोडाऊनच्या तिजोरीमध्ये ठेवलेले एक लाख ६२ हजार १३७ रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ग्रामीण पोलिसांना माहिती समजताच पोलिस निरीक्षक गणेश राहीरे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावून गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. लगेचच श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी दिली. वेअरहाऊसचे व्यवस्थापक उत्तम भगत यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास फौजदार संजय गिते करीत आहेत. 

बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत जुगाऱ्यांना अटक 
परभणी ः शहरातील बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या काही इसमांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी (ता.पाच) रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. जुने बसस्थानक पाडल्याने या ठिकाणी मोठी मोकळी जागा तयार झाली आहे. या परिसरात अनेक अवैध धंदे होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच सोमवारी (ता.पाच) या खुल्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. श्री.पाटील यांनी सोमवारी रात्री छापा टाकून कारवाई करत रोख ९१ हजार ८३० रुपयांसह एकूण एक लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक वैजनाथ आदोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com