डॉ. मुंडे दांपत्यासह तिघांना सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

सुदाम मुंडेला शिक्षा होणे ही चांगली बाब असली तरी, असे प्रकार सरकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा हप्तेखोरीशिवाय होऊ शकत नाहीत. त्यामुळे न्यायालयात सिद्ध झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी.
- महेश झगडे, तत्कालीन अन्न व औषध प्रशासन आयुक्त.

बीड - अवैध गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी परळी येथील डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे यांच्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज सुनावली. जिल्हा अतिरिक्‍ति सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील ११ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

धारूर तालुक्‍यातील विजयमाला महादेव पटेकर हिला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना महादेव पटेकर याने १७ मे २०१२ रोजी तिला डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे यांच्या परळीतील मुंडे हॉस्पिटलमध्ये   दाखल केले. त्यानंतर जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हे याच्या रुग्णालयात तातडीने करून घेतलेल्या गर्भलिंग निदान चाचणीत मुलगीच असल्याचे समोर आले. मुंडे दांपत्याच्या हॉस्पिटलमध्ये १८ मे रोजी विजयमालाचा गर्भपात करण्यात आला. त्या वेळी अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. 

रुग्णालयास परवानगी नसतानाही मुंडे दांपत्याने विजयमालाचा गर्भपात केला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून परळीत विविध कलमांन्वये डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे, महादेव पटेकर व इतर अशा एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बीड जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी सरकारी पक्षाचे साक्षी-पुरावे ग्राह्य धरून डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे, मृत विजयमालाचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील १७ आरोपींपैकी तिघांचा मृत्यू झाला. उर्वरित १४ पैकी तिघांना शिक्षा, तर ११ जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्‍तता करण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गाडेकर, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वाती भोर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.

न्यायालयाने डॉक्‍टर मुंडे दांपत्यास शिक्षा सुनावल्यावर सुदाम मुंडे याने मान हलवत शिक्षा कबूल केली. मुंडे दांपत्यासह पटेकरला न्यायालयाने सुनावलेली दंडाची रक्कम विजयमालाच्या मुलींना दिली जाणार आहे. तिच्या चार मुली आहेत.

यापूर्वीही झाली होती शिक्षा
डॉ. सुदाम मुंडे याच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रमुख ॲड. वर्षा देशपांडे, ॲड. शैलजा जाधव यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. सातारा येथून एका गर्भवतीला डमी रुग्ण म्हणून १९ सप्टेंबर २०२० रोजी मुंडेच्या रुग्णालयात पाठवले होते. डॉ. मुंडेने पाचशे रुपयांत तिची सोनोग्राफी करून मुलगा असल्याची चिठ्ठी देऊन सांगितले होते. याप्रकरणी १५ जून २०१५ ला परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवत त्यांना चार वर्षे कैद व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.

साडेसहा वर्षे शिक्षा भोगून पूर्ण
विजयमाला पटेकर हिच्या मृत्यूनंतर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर डॉ. मुंडे दांपत्य फरारी होते. १८ जून २०१५ ला ते पोलिसांना शरण आले.  तेव्हापासून डॉ. सुदाम मुंडे नाशिक येथील कारागृहात होता. त्याची पत्नी मात्र बाहेर होती. डॉ. सुदाम मुंडेने आतापर्यंत याप्रकरणी साडेसहा वर्षे शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला यापुढे केवळ साडेतीन वर्षे शिक्षा भोगावी लागेल, तर त्याची पत्नीला यापुढे दहा वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. महादेव पटेकर हा निकालाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सहा फेब्रुवारीला पळून गेला आहे. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.

सुदाम मुंडेला शिक्षा होणे ही चांगली बाब असली तरी, असे प्रकार सरकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा हप्तेखोरीशिवाय होऊ शकत नाहीत. त्यामुळे न्यायालयात सिद्ध झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी.
- महेश झगडे, तत्कालीन अन्न व औषध प्रशासन आयुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a woman by an illegal abortion Sudam Munde