एकट्या बीड जिल्ह्यात 1987 कोटींची शेतकरी कर्जमाफी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

  • घोषणेनंतर 93 हजार 700 खात्यांना जोडले आधार 
  • तीन लाखांवर कर्ज खात्यांना आधार लिंक 
  • आधार लिंक नसलेले केवळ 18 हजार खाते 

बीड - महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सर्व कर्ज खात्यांना आधार लिंक करणेही बंधनकारक केले. घोषणेनंतर जिल्ह्यात तब्बल 93 हजार 754 कर्ज खात्यांना आधार लिंक करण्याची प्रक्रिया झाली असून केवळ 18 हजार 355 कर्जखाते आधार लिंक नाहीत.

दरम्यान, या कर्जमाफीतून तीन लाख 20 हजार शेतकऱ्यांच्या झोळीत 1987 कोटी रुपये पडण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. यात एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत थकीत असलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाची माफी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. 

हेही वाचा - निवडणूक काळातील खर्चाची उड्डाणे, बीडमध्ये झाडाझडती

अनेक शेतकऱ्यांकडे दोन-दोन बॅंकांचे पीक कर्ज असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्जमाफीचा दुबार लाभ घेऊ नये यासाठी सरकारने प्रत्येक कर्जखात्याला आधार लिंक करणे सक्तीचे केले. दोन लाख रुपयांपर्यंतच्या आणि एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत थकीत असलेल्या कर्जखात्यांची संख्या तीन लाख 20 हजार 625 एवढी आढळली. यातील दोन लाख आठ हजार 516 कर्जखात्यांना आधार लिंक होते.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

एक लाख 12 हजार 109 खाते आधारशी जोडले नसल्याचे आढळले. दरम्यान, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पुढाकार घेऊन बॅंकांचा नित्याने फॉलोअप घेतल्याने आधार लिंकचे काम गतीने झाले आणि घोषणेनंतर 93 हजार कर्जखात्यांना आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ 18 हजार लिंक करणे बाकी आहे. 

हेही वाचा - नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी शासनाकडून 63 कोटींचा निधी

1987 कोटींची कर्जमाफी शक्‍य 
राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या लाभासाठी तीन लाख 20 हजार शेतकरी पात्र ठरत आहेत. दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज आणि एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत थकीत असलेले वरील शेतकरी या योजनेत पात्र आहेत. या शेतकऱ्यांच्या पदरात 1987 कोटी रुपये पडणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt Waiver To Farmers In Beed District