पैसे दाखवा, काम करतो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले.

औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. कामासाठी ठेवलेले पैसे दाखवा काम सुरू करतो, अशी अजब अट कंत्राटदाराने दाखविली असल्याने महापालिका अधिकारी त्रस्त आहेत.

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शहरातील विकासकामे ठप्प आहेत. केलेल्या कामाचे पैसे कधी मिळतील याची शाश्‍वती नसल्याने कंत्राटदारांनी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाला बसला आहे. क्रांती चौकातील शिवरायांच्या या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून केली जात होती. त्यानुसार गतवर्षी शिवजयंतीला या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, वर्ष उलटत आले तरी अजूनही प्रत्यक्ष कामास सुरवात झालेली नाही. त्यामुळे शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींनी महापालिकेकडे धाव घेऊन महापौरांना जाब विचारला होता. महापालिकेतर्फे नाहरकत द्या, आम्ही उद्याच काम सुरू करतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलगिरी व्यक्त करीत काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून गायत्री आर्किटेक्‍ट यांना एक कोटी ८४ लाख ५३ हजार ५७२ रुपयांचे हे काम देण्यात आले. कार्यारंभ आदेशही दिल्यानंतरही कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. या कंत्राटदाराने कामासाठी ठेवलेला निधी दाखवा, तरच काम सुरू करतो, अशी अट टाकली आहे.

कंत्राटदारावर गुन्हा  दाखल करण्याचे आदेश 
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कितीही नाजूक असली तरी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी निधी देण्याचा शब्द दिला आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र, कंत्राटदार अडवणूक करीत असेल तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, तसे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to increase the height of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Kranti Chowk