पाण्याच्या शोधात विहिरीत पडून हरणाचा मृत्यू, नैसर्गिक पाणवठे आटले

Deer Death, Her
Deer Death, Her

हेर  (जि.लातूर ) ः पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा हेर (ता.उदगीर) येथील वाघबर्डी परिसरात असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. येथील शेतकरी अंकुश कनकुरे यांचे वाघबर्डी परिचित परिसरात शेतविहीर असून, पाण्यासाठी तहानलेल्या हरणाने कुठेच पाणी दिसून येत नसल्याने विहिरीत उडी घेतली व पाणी पिऊन बाहेर येता येत नसल्याने आपला जीव गमावला. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास विहिरीत मृतावस्थेत हरण पडलेले शेतकरी कनकुरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तंटामुक्त अध्यक्ष बळवंत घोगरे यांच्यामार्फत वनविभागाला माहिती दिली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेले हरीण बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उदगीर येथे घेऊन गेले. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच माणसांसोबतच पाणीटंचाईच्या तीव्र झळा वन्यप्राण्यांनाही जाणवू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात वन्यजीव व प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागामार्फत वनीकरणाच्या जागेत कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आली आहेत. त्या पाणवठ्यात टँकरने पाणी भरण्याची योजनाही आखण्यात आली होती; मात्र वनविभाग कालांतराने हे विसरुन गेले. यामुळे शिवारातील नैसर्गिक पाणवठ्यासह कृत्रिम पाणवठे कोरडेठाक आहेत.

येणाऱ्या मे महिन्यात निर्माण होणारी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शिवारातील वन्यप्राण्यांना पाणी मिळावे व पाण्यासाठी वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत शिरकाव टाळण्यासाठी वनविभागाने पाणवठ्यात टँकरने पाणी भरावे व जिथे गरज आहे त्या ठिकाणी नवीन पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करण्याची वेळ येणार असल्याची चाहूल लागत असून, वन्यप्राण्यांना शिवारात पाणी उपलब्ध नाही झाल्यास प्राण्यासह वन्यजीवांचे मोठे हाल होणार आहेत. हेर परिसरातील जंगमवाडी, डिग्रस, वायगाव, जयाबाईचीवाडी आदी ठिकाणीही वनीकरण आहे. त्या ठिकाणी हरण, मोर, रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्या भागातील नैसर्गिक पाणवठे कधीचेच आटले असून, पाण्याचा कोणताही स्रोत नाही. यामुळे त्या ठिकाणी वनविभागाने नवीन पाणवठे तयार करून त्यात पाणी भरावे अशी मागणी वन्यप्रेंमींनी केली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com