विनयभंगप्रकरणी बीडमधील आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी, अपमानित पीडितेने केली होती आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अपर सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सुनावली. या प्रकरणात पीडितेने अपमानित होऊन आत्महत्या केली होती.

बीड - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अपर सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सुनावली. या प्रकरणात पीडितेने अपमानित होऊन आत्महत्या केली होती. फय्युम नय्युम सौदागर (रा. चौसाळा, ता. बीड) असे आरोपीचे नाव आहे. 

सात एप्रिल २०१६ ला दुपारी पीडिता व तिची मुलगी शिवण क्लासला जात असताना आरोपी फय्युम नय्युम सौदागर याने पीडितेची छेडछाड केली. यानंतर तिच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाइकासह पीडितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण, मानसिक त्रास देऊन तिला अपमानित केले. त्यामुळे अपमानित होऊन दहा एप्रिल २०१६ ला पीडितेने राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी आडूस ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पीडितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - बीडमध्ये सात तर चिंचपूर येथे दोन नवे रुग्ण

आष्टीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी आरोपीविरुद्ध मुदतीत न्यायालयास अंतिम दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी अपर सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून, आरोपीविरुद्धच्या सबळ पुराव्यामुळे व आरोपीवरील दोषारोप संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध झाल्याने आरोपीस दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा अपर सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील श्री. मस्कर यांनी बाजू मांडली व सरकारी पक्षाची बाजू मजबूत करण्यासाठी बिनवडे यांनी कामकाज पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defendant in Beed sentenced to one year hard labor