
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.
औरंगाबाद : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये उडालेल्या भडक्याच्या ठिणग्या औरंगाबादमध्येही पडायला सुरुवात झाल्या आहेत. सोमवारी (ता.16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्याला ईशान्येमध्ये विरोध सुरु आहे, त्याचे लोण दिल्लीमध्ये पसरले. दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी वसतीगृहात घुसून आंदोलन विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी (ता.16) सकाळी अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली.
हेही वाचा : इथे प्या, एक रुपयात एक घोट चहा
बॉटनिकल गार्डनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिल्ली पोलिस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, नही चलेगी नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी अशा डफाच्या तालावर घोषणा देत प्रशासकीय इमारतीकडे आंदोलक गेले. धाव घेतली. आणि या संघटनांनी विद्यापीठ बंद पुकारला.
आंदोलकांनी शैक्षणिक विभाग, मुख्य ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचे आवाहन केले. हे आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून आंदोलन सुरु आहे.
एनएसयुआय कार्यकर्त्यांनी फासले काळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र आहे. दिल्लीच्या घटनेच्या निषेधार्थ नॅशनल स्टूडंट युनियन ऑफ इंडियाच्यावतीनेही वेगळे आंदोलन करण्यात आले. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या नामफलकाला एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काळे फासले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.