विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ, सव्वादोनशे आंदोलने केली, पण... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

आजपर्यंत संघटनेने दोनशे पाच आंदोलने केली. आंदोलनावर लाठीचार्ज झाला. सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांपाठोपाठ विनाअनुदानित शिक्षकाच्याही आत्महत्या होत आहेत.

सिरसाळा (जि. बीड) - वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजपर्यंत या संघटनेने दोनशे पाच आंदोलने केली. आंदोलनावर लाठीचार्ज झाला. सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांपाठोपाठ विनाअनुदानित शिक्षकाच्याही आत्महत्या होत आहेत. या शिक्षकाचे प्रश्न जर सुटत नसतील तर पदवीधर, शिक्षक आमदार ही पदेच आता रद्द करावीत असा सूर उमटत आहे.

राज्यात १६३० माध्यमि, उच्च माध्यमिक तुकड्या असून, सुमारे बावीस हजार शिक्षक हे गेल्या वीस वर्षांपासून विनावेतन काम करीत आहेत. २०१४ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कायम शब्द काढला. कासवगतीने मूल्यांकन करण्यात आले. फेब्रुवारी २०१८ यावर्षी १४६ तर सप्टेंबर २०१९ यावर्षी एकूण १६३८ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय पात्र म्हणून घोषित झाले. किती वर्षे शिकायचे, कुठपर्यंत शिकवायचे असा प्रश्न पडल्याने या शिक्षकाना संसाराचा गाडा चालवणे वरचेवर कठीण होत आहे. त्यामुळे नातेवाईक, समाजकडून अवहेलना सहन करावी लागते.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

अनेक प्राध्यापक तर पोटाची खळगी भरण्यासाठी अधिव्याख्याता काम झाल्यावर उरलेल्या वेळात शेतात मिळेल त्या ठिकाणी मजुरीचे कामे करताना दिसून येतात. अनेकांनी वयाची पन्नाशी ओलांडली, आई-वडील वयोवृद्ध झाले, लेका झाला का रे तुला पगार सुरू अशी खंत व्यक्त होताना दिसते. आतातरी सरकारने मंजूर झालेल्या शाळा, कॉलेजला वेतन सुरू करावे ही मागणी होत आहे. 

बारा वर्षांपासून मी या संस्थेत हिंदी विषय शिकवतो. शाळेचे काम झाल्यावर घरखर्च भागवण्यासाठी माझे आडसला फ्रुटचे दुकान आहे. कधी-फळाचा गाडा सुरू ठेवावा लागतो. विनावेतन काम करताना अडचणी येतात, शासनाने आम्हाला अनुदान सुरू करण्याची मागणी केली. 
-प्रा. शेख महंमद मजीद, उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for grants to teachers