
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, भाजपच्या केंद्र सरकारने पाच जून२०२० रोजी लॉक डाऊन काळात शेतकरी विरोधी कायदे लागू केले
हिंगोली : दिल्ली येथे मागील आठ महिन्यापासून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे त्यास पाठिंबा म्हणून जिल्हाकचेरी समोर किसान बागेतून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, भाजपच्या केंद्र सरकारने पाच जून २०२० रोजी लॉकडाऊन काळात शेतकरी विरोधी कायदे लागू केले ते शेतकरी नेते, शेती तज्ञ यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने लागू केले आहे.
या कायद्याला भारतातील शेतकरी विरोध करीत असताना केंद्र शासन हे कायदे मागे घेत नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शाहीन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन करून जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी ता. २७ संपूर्ण राज्यात किसान बागेतून जिल्हाकचेरी समोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी झालेल्या धरणे आंदोलनात तबला, पेटीच्या तालावर गाणे गात वंचितने आगळे वेगळे आंदोलन केले, तसेच तुरीचे फांद्या, चारा हे आकर्षण दिसू लागले. या धरणे आंदोलनात सुरेश धोतरे, रविंद्र वाढे, वसीम देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.या ठिकाणी जिल्हा कचेरीला पोलिसांनी गराडा घातल्याचे चित्र होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे