धक्कादायक! औरंगाबादमध्ये उपजिल्हाधिकाऱयाने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

अनेक दिवसांपासून होते आजारी 

औरंगाबाद - भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी दीपक रामराव घाडगे (वय 45, रा. ऊर्जानगर, सातारा परिसर) यांनी बुधवारी (ता. 30) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 31) सकाळी उघडकीस आली. 

घाडगे हे गत अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात घाडगे कार्यरत होते. ते काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

निवडणूक काळात मिळाली नाही सुटी

निवडणूक काळात त्यांना सुटी न मिळाल्याने आजारी असूनही त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते. मनमिळाऊ व हसतमुख स्वभाव ही त्यांची खासियत होती. बुधवारी मध्यरात्री कुटुंबीयांनी त्यांना आवाज दिला; परंतु खोलीतून त्यांचा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी खिडकीतून डोकावले असता घाडगे यांनी गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात केले; डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 
  

हर्सूल तलावात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 
 

औरंगाबाद शहरातील हर्सूल तलावात उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 31) सकाळी साडेआठला उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, योगेश विष्णू शिरसाठ (वय 21, रा. हरिओमनगर, हर्सूल) असे मृताचे नाव आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

योगेश हा बुधवारी रात्री जेवण करून साडेआठला घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेला; परंतु तो घरी परतला नाही. त्यामुळे रात्री त्याचा नातेवाइकांनी शोध घेतला; परंतु तो रात्री सापडला नाही. सकाळी एक दुचाकी हर्सूल तलावाजवळ असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर नातेवाइकांना ही बाब कळविण्यात आली. त्यांनी हर्सूल तलावाजवळ धाव घेताच दुचाकी योगेशची असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा तलावात शोध घेत बाहेर काढले. योगेशच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Collector Suicide in Aurangabad