Loksabha 2019 : पिण्याच्या पाण्यासाठी देऊ लागेल तेवढा पैसा - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पिण्याच्या पाण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र व राज्य सरकारकडून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले.

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. युती सरकारने शहराला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी दिलाय. यापूर्वी कोणत्याच सरकारने दिला नव्हता. शहरातील सर्व रस्ते पूर्ण होईपर्यंत युती सरकार पैसे देत राहील. कचरामुक्ती, रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र व राज्य सरकारकडून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांची गजानन महाराज मंदिर चौकात जाहीर सभा झाली. उमेदवार खासदार खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, किशनचंद तनवाणी, एकनाथ जाधव, आरपीआयचे बाबूराव कदम, जिल्हाध्यक्ष देवयाणी डोणगावकर, शिरीष बोराळकर, प्रदीप जैस्वाल, अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर घोडेले यांनी प्रास्ताविक केले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ही निवडणूक फक्त मतांसाठीची नाही, तर ही लढाई आहे राष्ट्रीय अस्मितेची आणि देशाच्या विकासासोबतच सुरक्षेचीही. त्यामुळे कोणी कुठलेही चिन्ह घेऊन लढत असले, तरी युतीच्या चिन्हाशिवाय दुसरीकडे लक्ष देऊ नका. युतीच देशविरोधी शक्तींचा नायनाट करणार आहे. काँग्रेस ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ हे धोरण राबवीत आहे. केवळ नरेंद्र मोदींची निंदानालस्ती यावरच राहुल गांधी लोकांचे मनोरंजन करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खासदार खैरे म्हणाले, की मला पाचव्यांदा संधी द्या. पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी ‘समांतर’ची योजना वर्षभरात पूर्ण करू. यासाठी मुख्यमंत्री ५०० कोटी रुपयांचा निधी देतील.

‘तुम्ही खासदार निवडून  द्या, तुम्हाला विकास देऊ
समृद्धी महामार्ग व डीएमआयसीमुळे लाखो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. ११ हजार कोटींची गुंतवणूक डीएमआयसीमध्ये आम्ही आणली आहे. देशातील पहिली स्मार्ट सिटी डीएमआयसीमध्ये तयार होत आहे. या माध्यमातून जालना आणि औरंगाबाद राज्यातील नवीन हब बनणार आहे. जिल्ह्यात अडीच हजार कोटींची सिंचनाची कामे सुरू आहे. तुम्ही आमचा खासदार निवडून द्या, आम्ही विकास देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

‘इथे खैरे नाही, मोदी उभे आहेत’
शाहनवाज हुसैन म्हणाले, की औरंगाबाद मतदारसंघातून खासदार खैरे उमेदवार नाहीत तर मोदीच येथे उभे आहेत, असे समजा. देशातील प्रत्येक उमेदवार हा मोदीच आहे. शहरात काँग्रेसने ‘बी टीम’ उभी केल्याचे सांगत त्यांनी एमआयएमलाही टोला लगावला.

Web Title: Devendra Fadnavis said that the amount of money required for drinking water will be given by the state governments