शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, देवेंद्र फडणवीस

गणेश पांडे
Tuesday, 20 October 2020

परभणी जिल्ह्यातील निळा (ता.सोनपेठ) येथील शिवारात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, मोहन फड, सुरेश भुमरे व इतर.

सोनपेठ, गंगाखेड ः याच शिवारातून मुख्यमंत्री उध्दवजी यांनी शेतकऱ्यांना २५ हजार नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता त्यांना अधिकार आहेत. त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी असे सांगत शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२०) निळा (ता.सोनपेठ) जाहीर केले.

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी (ता.२०) सोनपेठ तालुक्यातील निळा येथे भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य अभय चाटे, रामप्रभू मुंढे, समीर दुधगावकर, भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीड शहराध्यक्ष फारुक शेख, विठ्ठलराव रबदडे, सुरेश भुमरे, डॉ. विद्या चौधरी सोनपेठ मंडल अध्यक्ष सुशील रेवडकर ,कृष्णाजी सोळंके, शिवाजी मोहाळे, रंगनाथ सोळंके, अरुण मुंडे, रवि जोशी, अॅड.आदिनाथ मुंडे, संजय बेटकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - बॉयोमिक्सच्या विक्रीतून परभणी कृषी विद्यापीठाने रचला इतिहास 

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले 
या वेळी बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, यावर्षी पडलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहीजे या मताचा मी असल्याचा निर्वाळा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांनी स्मरणही करुन दिले. मागील वर्षी पडलेल्या पावसाने जेव्हा नुकसान झाले होते. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन २५ हजार रुपये हेक्टरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत. 

हेही वाचा - परभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक...! परंतू होत का नाही ?

शेतकऱ्यांच्या वतीने रुमने आणि चाबूक फडणवीस यांना भेट 
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसान भरुन निघणे शक्य नाही. मात्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ बिनाअट मदत करा अशी मागणी त्यांनी या वेळी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रुमने आणि चाबूक फडणवीस यांना भेट दिली. या दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis will not remain silent without getting help to farmers, Parbhani News