भोकरदनचे धामणा धरण ओव्हरफ्लो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणा धरण

भोकरदनचे धामणा धरण ओव्हरफ्लो

भोकरदन (जिल्हा जालना) : सलग दोन दिवसांपासून भोकरदन तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला असून, तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे जुई मध्यम प्रकल्पही रात्रीतून भरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: एसटीच्या कळंब आगाराला डिझेल टंचाईचे ग्रहण

पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली होती. भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारा जुई मध्यम प्रकल्प पूर्णपणे रिकामा झाला होता तर तालुक्यातील धामणा, पद्मावती व बानेगाव प्रकल्पातही जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे तालुक्यात भयावह स्थिती निर्माण होऊन भविष्यात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गत आठवड्यात तालुक्यात तसेच धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने सर्वांना दिलासा मिळाला आहे. त्यात सोमवार (ता.सहा) रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण दुपारी चार वाजेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले असून, या धरणातून जवळपास वीस ते पंचवीस गावांची तहान भागविल्या जाते. त्यापाठोपाठ आता भोकरदन शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातही मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 80 टक्के म्हणजे 16 फूट इतका जलसाठा जमा झाला असून, यात वेगाने आवक सुरू असल्याने मंगळवारी रात्रीतून जुई धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. तसेच वालसावंगी भागातील पद्मावती धरणातही 80 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने तालुक्याला पाणी टंचाईच्या संकटातून मुक्तता मिळाली आहे.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे बीडमध्ये 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला;पाहा व्हिडिओ

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

धामणा धरण शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी काठी असलेल्या शेलूद, लिहा, पारध बुद्रुक, पारध खुर्द, सावंगी अवघडराव आदी गावांना सिंचन विभागाच्यावतीने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Dhamana Dam Overflow Alert River Side Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AlertDhamana dam