धनंजय मुंडे म्हणाले, मोदीजी परळीत हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

परळी मतदार संघात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात काट्याची लढत असून दोघेही या आरपारच्या लढाईसाठी सर्व ताकदीनीशी मैदानात उतरले आहेत. मतदार संघात परळी शहरातील पाणी टंचाई, दर्जाहिन कामे, वैद्यनाथ कारखाना आणि अंबाजोगाई - परळी रस्ता ही प्रमुख मुद्दे प्रचारात अजेंड्यावर आहेत.

बीड : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. पण, त्यांनी हे स्वागत उपहासात्मक केले असून येताना हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या म्हणजे तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास दिसेल’ असा टोला लगावला आहे.

परळी मतदार संघातील अंबाजोगाई - परळी रस्त्याचे काम मागच्या दोन वर्षांपासून रखडल्याने प्रवाशी हैराण आहेत. परळी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रचारात हा रस्ता प्रमुख मुद्दा ठरत आहे. 

परळी मतदार संघात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात काट्याची लढत असून दोघेही या आरपारच्या लढाईसाठी सर्व ताकदीनीशी मैदानात उतरले आहेत. मतदार संघात परळी शहरातील पाणी टंचाई, दर्जाहिन कामे, वैद्यनाथ कारखाना आणि अंबाजोगाई - परळी रस्ता ही प्रमुख मुद्दे प्रचारात अजेंड्यावर आहेत.

दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंकजा मुंडेंसह जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी परळीत प्रचारसभा घेणार आहेत. यावर धनंजय मुंडे यांनी निशाना साधत ‘मोदीजी तुम्ही परळीत येताय तुमचे स्वागत!, एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास दिसेल. चंद्रयान - २ मोहिमेदरम्यान तुम्ही चार तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा! असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanajay Munde attacks Pankaja Munde on road condition in Beed