

Dharur Forest Fire
esakal
ईश्वर खामकर
बीड : किल्लेधारू शहरातील विश्रामगृह परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जून महिन्यात ३० गुंठे क्षेत्रावर तब्बल नऊ हजार झाडांची घनवन लागवड करण्यात आली होती. यासाठी चार लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून लागलेल्या आगीत यातील ४०० ते ४५० झाडे जळून खाक झाली. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या घनवनाची राख होत असताना सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धारूर येथील विश्रामगृह परिसरात ३० गुंठे क्षेत्रावर घनवन निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये कडुनिंब, बाभूळ, चिंच, साग, सीताफळ यांसह विविध प्रकारच्या फळझाडांची आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली होती. नऊ हजार झाडांच्या संगोपनासाठी परिसरात कंपाउंड करण्यात आले होते. तसेच झाडांना नियमित पाणी मिळावे, यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, अचानक लागलेल्या आगीत यातील ४०० ते ४५० झाडे जळाल्याने या उपक्रमाला मोठा फटका बसला आहे.विशेष म्हणजे, ज्या परिसरात ही लागवड करण्यात आली आहे, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही कर्मचारीही वास्तव्यास आहेत. असे असतानाही आग नेमकी कोणी लावली, याचा शोध अद्याप लागलेला नाही.