रोगराईच्या विळख्यात अडकली पपईची बाग; पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका

अविनाश काळे
Sunday, 27 September 2020

उमरगा येथील तरूण शेतकरी अभिषेक औरादे यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या दोन एकर पपईची बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु असल्याने सर्वच क्षेत्रांत मंदीची लाट आहे. मात्र त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. विशेषतः बागायती क्षेत्रातील मालाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. त्यात पुन्हा मध्यंतरी वातावरणाच्या बदलामुळे आणि पावसामुळे पपईच्या बागेचे नुकसान झाले.

दोन हजार मेंढ्या बचावल्या, तरुणांनी दिला मेंढपाळाला मदतीचा हात

दरम्यान पानगळ थोड्या प्रमाणात झाली. त्यापेक्षा फळालाच व्हायरसने (बुरशी) घेराव घातल्याने नासाडीचे प्रमाण वाढले. उमरगा येथील तरूण शेतकरी अभिषेक औरादे यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या दोन एकर पपईची बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र व्हायरस काही केल्या कमी होत नाही.

श्री.औरादे यांनी जानेवारी २०२० मध्ये दोन लाख खर्च करुन दोन एकर क्षेत्रात पपईची बाग फुलवली. सोळाशे झाडांना फळे लगडली. महिनाभरापासून उत्पन्न हाती आले असताना बदलत्या वातावरणाचा फटका आणि अधून-मधून पावसाच्या माऱ्याचा फटका फळाला बसला. बहुतांश पपई फळावर व्हायरसचा प्रभाव दिसू लागल्याने महागड्या औषध फवारणीचे दोन टप्पे पूर्ण करण्यात आले, तरीही फळाची नासाडी कमी होत नाही.

पावसाने लावली हळदीची वाट ! जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !

अपेक्षित उत्पन्न होते सहा लाखांचे
श्री.औरादे यांना दोन एकरात किमान साठ टन पपईचे उत्पन्न अपेक्षित होते. किमान दहा रुपये किलो दर मिळेल असे अपेक्षित होते. तो दरही मिळू शकला नाही. लॉकडाउनच्या परिस्थितीने निच्चांकी दर सहा ते सात रुपये मिळत. त्यात मध्यंतरी दहा दिवस पावसाची रिपरिप आणि रोगराईच्या तडाक्याने झाडाची पानगळ सुरू झाली. पुन्हा आठ दिवसात मोठे पाऊस झाले. त्यामुळे पानगळ सुरू झाल्याने लगडलेल्या फळासाठीचे सुरक्षा कवचही निघू गेले.

पावसामुळे नऊशे हेक्टर ऊस पडला आडवा, शेतकरी आर्थिक अडचणीत

शिवाय फळाला बुरशीचा घेराव निर्माण झाल्याने नासाडी सुरू झाली. जवळपास सात ते आठ टन पपई उकिरड्यात फेकून द्यावी लागली. आठ दिवसापूर्वी सात टन पपई सात हजार रुपये टनाप्रमाणे बाजारपेठेत विक्री केली. त्यातून आलेली जेमतेम रक्कम औषध फवारणी व देखरेखीसाठी खर्च केली जात आहे, तरीही नासाडीचे प्रमाण कमी होत नाही. कच्ची पपईवरही विषाणूचा वाढलेला घेरा स्पष्टपणे दिसू लागल्याने त्याची मागणीही घटली आहे, असे श्री.औरादे यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diseases Affect Papaya Bhaug Umarga News