Video - जिल्हा शल्यचिकित्सकांना पदमुक्त करा, भाजप झाले आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार सुरळीत करण्यासाठी आपल्या माध्यमातून योजना आखावी आणि सर्व रुग्णांना सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भरोसे यांनी केली आहे.

परभणी :  कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात जिल्हा शासकीय रुग्णालयातील आवस्था दयनीय झाली आहे. ही परिस्थिती सांभाळण्यात जिल्हा शल्यचिकित्सक सपशेल अपयशी ठरले असून त्यांना तातडीने पदमुक्त करावे, या मागणीसाठी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी (ता. २८) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गानंतर कारभार ढेपाळला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी या कोरोनाच्या अत्यंत बिकट प्रसंगी विलगीकरण कक्ष आणि कोरोनाबाधित रुग्णांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, असा आरोप भाजपचे आनंद भरोसे यांनी केला आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...

विलगीकरण कक्षातील स्वच्छता व भोजनाच्या व्यवस्थेकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्र शासनाने राज्य शासनास निधी उपलब्ध करून सर्व अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेले आहेत. असे असतानाही डॉ. श्री. नागरगोजे यांचे याकडे लक्ष राहिले नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील सील करण्याची वेळ आली आहे.

येथे क्लिक कराच शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्षक आमदार म्हणाले...

त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची या पदावरून त्वरित मुक्तता करावी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार सुरळीत करण्यासाठी आपल्या माध्यमातून योजना आखावी आणि सर्व रुग्णांना सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भरोसे यांनी केली आहे.
 

जिल्हा शल्यचिकित्सकांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागातील जबबादार अधिकाऱ्यांनी असे निष्काळजीपणे वागणे गंभीर बाब आहे. या संदर्भात आपण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बोललो आहोत. असे बेजबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने पदमुक्त करावे, अशी आपली मागणी आहे.
- आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष (शहर) भाजप, परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismiss District Surgeons, BJP Has Become Aggressive Parbhani News