वापरलेल्या मास्‍कची ‘डिस्‍पोज मित्रा’ लावणार विल्‍हेवाट

राजेश दारव्हेकर
Friday, 8 May 2020

हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी एक यंत्र तयार केले असून वापरलेले मास्क नष्ट करण्यास मदत होत आहे. पुष्यमित्र जोशी यांनी या यंत्राला ‘डिस्‍पोज मित्रा’ असे नाव दिले आहे.

हिंगोली : नागरिकांनी वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी यांनी डिस्‍पोज मित्रा उपकरण तयार केले असून वापरलेले पंधरा मास्‍क आणून देणाऱ्या नागरिकांना होममेड सॅनिटायझर भेट देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क लावत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत असली तरी वापरलेले मास्क नागरिक कुठेही फेकून देत असल्याचे चित्र आहे. यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आता वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे. 

हेही वाचाहिंगोलीतील ‘त्या’ कोरोना बाधित जवानांचा रुग्णालयात गोंधळ

मास्क नष्ट करण्यास मदत

यावर मात करण्यासाठी हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी एक यंत्र तयार केले असून वापरलेले मास्क नष्ट करण्यास मदत होत आहे. पुष्यमित्र जोशी यांनी या यंत्राला ‘डिस्‍पोज मित्रा’ असे नाव दिले आहे. या यंत्राद्वारे एक ते दोन तासात एक ते दीड किलो मास्‍कची विल्‍हेवाट लावता येते.

सॅनिटायझरही घरीच तयार केले

 यासाठी घरोघरी जाऊन मास्‍क गोळा करण्याची सुरवात त्‍यांनी केली असून त्यांना मित्रही साथ देत आहेत.  विशेष म्हणजे नागरिकाने पंधरा मास्‍क दिल्यानंतर त्‍यांना होममेड सॅनिटायझर मोफत दिले जात आहे. हे सॅनिटायझरही त्यांनी घरीच तयार केले आहे. त्‍याच्या उपक्रमाला हनुमान व्यायाम शाळा, हिंगोलीचा राजा मित्र मंडळ व साई माऊली विद्यालयाचे सहकार्य मिळत आहे. 

मित्रपरिवारांची मदत

तसेच वापरलेले मास्‍क गोळा करण्यासाठी रोहित चित्तेवार, अरविंद चित्तेवार, श्रीकांत चोंढेकर, प्रथम मुदीराज, मानव चित्तेवार, गजानन पवार आदी मदत करीत आहेत. उपक्रमाला माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, पांडुरंग लुंगे पहिलवान, कृष्णा लुंगे पहिलवान यांनी शुभेच्‍छा दिल्या आहेत.

उत्‍कृष्ट वैज्ञानिक पारितोषिक

पुष्यमित्र जोशी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात एम. एस्सीचे शिक्षण घेत आहेत. भारतीय विद्यापीठ संघटनेतर्फे आयोजित स्‍पर्धेत डिस्‍पोज मित्रा या उपकरणाचे सादरीकरण केले होते. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे २०१९ मध्ये झालेल्या १३ व्या अविष्कार राज्यस्‍तरीय वैज्ञानिक संमेलनात उत्‍कृष्ट वैज्ञानिक पारितोषिक मिळाले होते.

येथे क्लिक कराबटाट्याच्या दोन एकर शेतात सोडली जनावरे...कुठे वाचा

 संशोधनाचे सादरीकरण

 तसेच संशोधनासाठी राज्यपालांची (फेलोशिप) देखील मिळाली आहे. दरम्यान, संगमनेर येथे आंतरराष्‍ट्रीय वैज्ञानिक परिषदेत त्‍याने या उपकरणावर आधारित संशोधनाचे सादरीकरण केले होते. याबद्दल त्‍याला उत्‍कृष्‍ट युवा वैज्ञानिक पुरस्‍कार मिळाला आहे. मेहसाना (गुजरात) येथे २०१८ मध्ये आयोजित स्‍पर्धेतही त्‍याला पुरस्‍कार मिळाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disposal of used masks will be disposed of Hingoli news